लोकसभा निवडणुकीआधी भाजपमे 400 पारचा नारा दिला. पण भाजपला स्वबळावर बहुमताचा आकडाही गाठता आला नाही. केंद्रात एनडीए सरकार सत्तेत आलं. आता या सगळ्याचा परिणाम महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत दिसणार आहे. पण लोकसभा निवडणूक संपताच भाजपला मोठा धक्का बसला आहे. एका महिला नेत्याने पक्षाला रामराम केला आहे.






सूर्यकांता पाटील यांनी २०१४ साली भाजपात प्रवेश केला होता. हदगाव विधानसभेच्या संयोजक पदी त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. हदगांव मतदार संघातून त्यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची भाजपकडे इच्छा व्यक्त केली होती, पण त्यांना संधी काही मिळाली नाही. शिवाय माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि डॉ अजित गोपछडे यांना राज्यसभेत घेतल्याने त्या नाराज होत्या. दिल्ली येथील शेतकरी आंदोलन, अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेश या विषयी त्यांनी परखड मतं व्यक्त करत भाजपाला घरचा आहेर दिला होता. पक्षाकडून वेळोवेळी डावलल्या जात असल्याने माजी मंत्री सूर्यकांता पाटील या नाराज तर होत्याच, शिवाय त्या वेगळी वाट धरणार अशी चर्चा देखील सुरु होती. अखेर त्यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा पक्षाकडे सुपूर्द केला आहे. मागील दहा वर्षात पक्षात राहून खूप काही शिकायला मिळालं आहे. तालुक्यात बूथ कमिटी पर्यंत काम केलं आहे. कोणतही ही कटुता मनात नसल्याचं त्यांनी राजीनामा पत्रात म्हण्टलं आहे. दरम्यान त्यांच्या राजीनाम्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
सूर्यकांता पाटील यांनी मध्यतंरी राजकारणातून सन्यास घेणार असल्याच जाहीर केल होत, परंतु अस असलं तरी त्या राजकारणात होत्या. पक्षातून महत्वाचं कुठलेही स्थान दिलं जातं नसल्याने त्या अधून मधून खदखद व्यक्त करत होत्या. दरम्यान राजीनाम्यानंतर सूर्यकांता पाटील या कोणत्या पक्षात जाणार याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. आगामी विधान परिषदची काँग्रेसला सुटणार अशी शक्यता, त्यामुळे त्या काँग्रेस पक्षात जाऊ शकतील अशी देखील चर्चा आहे. राष्ट्रवादी शरद पवार गट तथा अजित पवार गटातील नेत्याच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे.
आपल्या सोबत गेल्या १० वर्षात खुप काही शिकता आले. तालुक्यात बुथ कमीटीपर्यंत काम केले. आपण दिलेल्या संधीसाठी मी आपली आणि भारतीय जनता पार्टीची अत्यंत आभारी आहे. मी आपला निरोप घेत आहे. प्रत्यक्ष भेटीचा प्रयत्न केला पण आपल्या व्यस्ततेमुळे ते शक्य झाले नाही. कोणतीही कटूता मनात न ठेवता मी राजीनामा देत आहे, ते स्विकारावा ही नम्र विनंती असे सूर्यकांता पाटील यांनी त्यांच्या राजीनामा पत्रात म्हटले आहे.










