निवडणुकीपुरतं राजकारण केलं पाहिजे. एकमेकांचे विरोधक म्हणून त्यांच्याकडं ‘मारक्या म्हशी वाणी बघायचं’, असं कुठं असतं का? आपण लहान्या माणसांसारखं लहान राहायचं. ते मोठे आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मी पालकमंत्री राधाकृष्ण विखे साहेबांकडे जाणार आहे. ‘आशीर्वाद द्या साहेब’, असे म्हणणार असल्याचे सांगून नगर जिल्ह्यात यापुढे विकासासाठी सहमतीचे राजकारण करणार असल्याचे संकेत खासदार नीलेश लंके यांनी दिले.






नगर शहरातील केडगावमध्ये झालेल्या सत्कार कार्यक्रमात खासदार लंके यांनी विखे कुटुंबावर सुस्तीसुमने उधळली. खासदार लंके यांनी विखेंच्याबाबत घेतलेली नरमाईची भूमिका राजकीय चर्चेचा विषय ठरली आहे. खासदारकीच्या निवडणुकीत नीलेश लंके यांच्यासाठी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांची भूमिका महत्त्वाची ठरली होती. निवडून आल्यानंतर थोरात यांची लंकेशी भेट झाली नव्हती. थोरात आजारपणामुळे संगमनेरमध्ये होते. त्यामुळे नीलेश लंके यांनी त्यांची संगमनेरमध्ये जाऊन भेट घेतली.
ही भेट आटोपून नगरमध्ये आल्यावर केडगावमध्ये एका कार्यक्रमात सहभागी झाले. नीलेश लंके यांनी या कार्यक्रमात चांगलीच टोलेबाजी केली. संगमनेर येथे बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री करण्याचे भाकीत करून येत नगरमधील कार्यक्रमात पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या कुटुंबाच्या सहकारातील योगदानावर स्तुतीसुमने उधळली.
नीलेश लंके म्हणाले, “निवडणुकी पुरते राजकारण असते. आता पुढे विकासासाठी माझी धावपळ असणार आहे. यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांचे आशीर्वाद घेणार आहे. विखे परिवार जिल्ह्यात मोठा आहे. सहकार त्यांचे मोठं काम आहे. निवडणुकीत समोरासमोर असल्यावर बोलायचे असते. पण निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोप लावून धरायचे का? राज्यात फिरत असताना मी अभिमानानं सांगोत आशिया खंडातील पहिला सहकारी साखर कारखाना पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील यांनी उभा केला. हा अभिमानच आहे. राज्याचे महसूल आणि दुग्धविकास मंत्री माझ्या जिल्ह्यातील आहे. हा देखील माझ्यासारख्या लहान्या माणसाला अभिमान आहे”.
“विरोधक म्हणून कामयच विरोध करत राहयचं का? माझं जिल्हा नियोजन समितीत काम असल्यावर मला पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखे साहेबांकडेच जावा लागणार आहे. माझं काम असल्यावर मी त्यांच्याकडेच जाणार. हक्कानं मी म्हणू शकलो पाहिजे. मदत करा साहेब. काम झालं पाहिजे. असं राजकारण पुढे करायचे आहे. मी त्यांच्याकडे मारक्या म्हशी वाणी बघायचं अन् विरोधला विरोध करत राहायचं. आपण लहान माणसानं लहान्यासारखं वागलं पाहिजे. ते मोठे आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत मी त्यांच्याकडे गेल्यावर आशीर्वाद द्या साहेब, असे म्हणणार आहे. तुम्ही मोठे आहे, असे सांगून कामाला सुरवात करत असतो”, असे खासदार नीलेश लंके यांनी म्हटले.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार सुजय विखे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्यात चुरशीची लढत झाली. या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष होते. विखे यांनी ही लढत प्रतिष्ठेची केली होती. शरद पवार यांनी देखील यंदा उमेदवार निवडून आणायचाच, असा चंग बांधला होता. चुरशीच्या लढतीत नीलेश लंके यांनी बाजी मारली.











