नरेंद्र मोदी आणि त्यांच्या 71 मंत्र्यांनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यानंतर काल (10 जून) खातेवाटपही जाहीर झालं. ज्यानंतर महाराष्ट्राला नेमकं काय मिळालं याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे. 2014 आणि 2019 लोकसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीएला 40 हून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, यंदाच्या निवडणुकीत भाजप आणि एनडीएला केवळ 17 जागांवर समाधान मानावं लागलं. पण याचाच फटका हा मंत्रिमंडळात देखील बसल्याचं पाहायला मिळतंय. मागील दोन्ही लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने मोदींना भरभरून यश दिलं होतं. मात्र, यंदा मात्र तसं घडलं नाही. मागील दोन्ही निवडणुकांनंतर मोदींनी महाराष्ट्रात बरीच मंत्रिपदं दिली होती. मात्र, आता मंत्रिपदांची संख्या ही कमी झाली आहे.
2024 लोकसभा निवडणुकीनंतर मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्राला काय मिळालं?
1. नितीन गडकरी – रस्ते विकास आणि महामार्ग मंत्रालय (कॅबिनेट)
2. पियुष गोयल – वाणिज्य आणि उद्योग (कॅबिनेट)
3. प्रतापराव जाधव – आयुष मंत्रालय, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय (राज्यमंत्री, स्वतंत्र प्रभार)
4. मुरलीधर मोहोळ – सहकार आणि नागरी उड्डाण मंत्रालय (राज्यमंत्री)
5. रक्षा खडसे – युवक कल्याण आणि क्रीडा मंत्रालय (राज्यमंत्री)
6. रामदास आठवले – सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालय (राज्यमंत्री)
2019 च्या तुलनेत महाराष्ट्राला एक कॅबिनेट मंत्रिपद हे कमी मिळालं आहे. 2019 मध्ये तीन कॅबिनेट मंत्रिपदं होती तर यंदा दोनच कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. यामुळे यावेळस महाराष्ट्राच्या वाटेला कमी मंत्रिपदं आली आहेत.
2019 लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील 8 नेत्यांना मंत्रिपदं मिळाली होती. ते नेते नेमके कोण होते आणि त्यांना कोणती खाती मिळाली होती हे आपण सविस्तरपणे पाहूयात….
1. नितिन गडकरी (कॅबिनेट) – रस्ते विकास आणि महामार्ग
2. पियुष गोयल (कॅबिनेट) – वाणिज्य आणि उद्योग
3. नारायण राणे (कॅबिनेट) – सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग
4. रामदास आठवले (राज्यमंत्री) – सामाजिक न्याय
5. भागवत कराड (राज्यमंत्री) – अर्थ
6. डॉ. भारती पवार (राज्यमंत्री) – आरोग्य
7. कपिल पाटील (राज्यमंत्री) – पंचायती राज
8. रावसाहेब दानवे (राज्यमंत्री) – रेल्वे
अशा एकूण 8 जणांना मंत्रिपदं मिळाली होती. ज्यामध्ये अनेक चांगली खातीही त्यांना देण्यात आली होती. या 8 जणांमध्ये रामदास आठवले, पियुष गोयल, नारायण राणे आणि भागवत कराड हे राज्यसभेचे खासदार होते. यापैकी पियुष गोयल हे मुंबई उत्तर मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेले. त्यामुळे त्यांना यंदा मंत्रिपद देण्यात आलं. तर राज्यसभेतील खासदार रामदास आठवले यांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं. पण जे नारायण राणे लोकसभेवर निवडून गेले त्यांना यंदा कोणतंही मंत्रिपद देण्यात आलं नाही. तसंच भागवत कराड यांचाही पत्ता कापण्यात आला.
तर दुसरीकडे भारती पवार, कपिल पाटील आणि रावसाहेब दानवे या तीनही केंद्रीय राज्यमंत्र्यांचा यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे त्यांनाही मंत्रिपदाला मुकावं लागलं. दरम्यान, महाराष्ट्र विधानसभा निवडणुका या अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. अशावेळी मिळालेली कमी मंत्रिपदं याचा नेमका आगामी निवडणुकीवर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.