पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज तिसऱ्यांदा देशाच्या पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह एनडीएच्या विविध खासदारांनी मंत्रिपद आणि राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मोदींच्या मंत्रिमंडळात महाराष्ट्रातून अठराव्या लोकसभेत निवडून गेलेले खासदार नितीन गडकरी आणि पीयूष गोयल यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाची शपथ घेतली. यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्षाचे खासदार प्रतापराव जाधव, आरपीए पक्षाचे प्रमुख रामदास आठवले यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली. परंतु खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्तिगत लक्ष घालूनही भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाची वाताहात झाली. प्रकाश आंबेडकर यांच्या मदतीने शिंदे गटही 3 ठिकाणी (बुलढाणा हातकगले मुंबई) विजयी झाला. मित्रपक्ष शिवसेना महाराष्ट्रात समाधानकारक(७)जागा मिळवून उत्साहात असताना भारतीय जनता पक्षाचा राज्यात झालेला पराभव जिव्हारी लागला असून राज्यात पक्षाची प्रतिमा सुधारण्यासाठी वेगळे निर्णय घेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
केंद्रीय पातळीवरती उत्कृष्ट काम करणारे निष्ठावान दोन भारतीय जनता पक्षाचे खासदार यांना प्रतिष्ठा देण्यात आली आहे परंतु राज्यात भाजपा बरोबर राहिलेल्या एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांच्या पदरी मात्र निराशा पडली आहे. त्यातच राज्यमंत्रीपदी रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ यांच्या यांच्या पंक्तीमध्ये मित्र पक्षांच्या खासदारांना उभे केल्यामुळे राज्यात नव्या समीकरणाची चर्चा सुरू झाली आहे. सलग तिसऱ्यांदा खासदार झालेल्या प्रतापराव जाधव यांनाही राज्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली हे कदाचित मित्र पक्षाच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
या शपथविधीच्या कार्यक्रमात मोदींनी एकनाथ शिंदे आणि रामदास आठवले यांना धक्का दिल्याची चर्चा आहे. कारण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे महाराष्ट्रात 7 खासदार निवडून आले आहेत. तरीही त्यांच्या पक्षाला एकही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलेलं नाही. तसेच रामदास आठवले यांना यावेळीही राज्यमंत्रीपदच देण्यात आलं आहे. महायुतीमधील महत्त्वाचा घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटालाही भाजपकडून राज्यमंत्रीपदाची ऑफर देण्यात आली होती. पण अजित पवार गटाने राज्यमंत्रीपदाची ऑफर नाकारली होती. अजित पवार गटाला केंद्रीय कॅबिनेट मंत्रीपदाची जबाबदारी हवी होती. पण भाजपकडून त्यांना केवळ राज्यमंत्रीपदासाठी विचारणा करण्यात आली होती. त्यामुळे अजित पवार गटाने ती ऑफर नाकारली. आगामी काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होईल तेव्हा अजित पवार गटाचा विचार केला जाईल, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत. त्यामुळे आगामी काळात काय-काय घडामोडी घडतात, ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.