लोकसभा 2024 चा निकाल लागला असून देशात एनडीए सरकारला यश मिळालं. दरम्यान यंदाच्या लोकसभेत एनडीए सरकारला 293 जागा मिळाल्या. दरम्यान विरोधकांच्या इंडिया आघाडीला एकूण 234 जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे देशात पुन्हा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार का हे काही दिवसांतच स्पष्ट होईल. पण त्याआधी एनडीए सरकारचं सर्वच स्तरातून अभिनंदन केलं जातंय. रजनीकांत यांनी देखील काळजीवाहू पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे देखील अभिनंदन केलं आहे.






अभिनेते रजनीकांत यांनी पंतप्रधान मोदी यांचे आणि चंद्राबाबू नायडू तसेच एम. के स्टॅलिन यांचे देखील अभिनंदन केलं आहे. दरम्यान तमिळनाडू राज्यामध्ये एम.के.स्टॅलिन यांच्या द्रमुक पक्षाचे सर्वाधिक खासदार निवडून आले. त्याचवेळी आंध्र प्रदेशात विधानसभेच्या निकालांचा देखील धुरळा उडाला. त्यावेळी चंद्रबाबू नायडू यांचं सरकार आलं. त्यामुळे रजनीकांत यांनी त्यानिमित्ताने या दोघांचेही आभार मानले आहेत.
रजनीकांत यांनी काय म्हटलं?
रजनीकांत यांनी एक्स पोस्ट करत यावर प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी म्हटलं की, माझे प्रिय मित्र आणि तमिळनाडूने मुख्यमंत्री एम के स्टॅलिन आणि चंद्राबाबू नायडू यांचे मनापासून अभिनंदन. तसेच एनडीए सरकारला आणि आदरणीय नरेंद्र मोदींजींचे देखील मनापासून अभिनंदन.
दरम्यान आता सत्तास्थापनेसाठी एनडीए दावा करणार असून त्यासाठी दिल्लीत एनडीएमधील घटक पक्षांची बैठक देखील पार पडली. त्यातच दिल्लीत इंडिया आघाडीची देखील बैठक पार पडली. त्यातच इंडिया आघाडीतील काही नेत्यांची नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासोबत चर्चा सुरु असल्याच्या बातम्या देखील समोर आल्या होत्या. पण नितीश कुमारांनी हे वृत्त फेटाळलं. त्यातच इंडिया आघाडी देखील सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यामुळे आता दिल्लीत कोणाचं सरकार बसणार हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.











