महायुतीमध्ये निकलाआधीच फूट? शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा, अजित पवारांची थेट उमेदवारीच जाहीर

0
1

लोकसभा निवडणुकीवेळी महायुतीत निर्माण झालेला पेच विधान परिषद निवडणुकीत पाहायला मिळत आहे. विधान परिषदेच्या चार जागांसाठी निवडणूक होत असून, पुन्हा एकदा भाजपने शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे अजित पवारांनी उमेदवार जाहीर केला आहे. त्यामुळे महायुतीतील मित्रपक्षामध्ये कुरघोड्या सुरू झाल्याच्या चर्चेला तोंड फुटले आहे. लोकसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणापर्यंत महायुतीत जागांच्या वाटाघाटी सुरू राहिल्या. त्याचा फटका प्रचारात बसल्याची चर्चा असताना आता विधान परिषद निवडणुकीत महायुतीतील मित्रपक्षांमध्ये पुन्हा एकदा संघर्ष सुरू झाला आहे.

मुंबई पदवीधर मतदारसंघ, मुंबई शिक्षक मतदारसंघ आणि कोकण पदवीधर मतदारसंघ या तीन जागांवरून महायुतीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे शिंदेंची शिवसेना-अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप-शिंदेंची शिवसेना असा हा पेच निर्माण झाल्याची सद्यस्थिती आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार 

शिंदेंच्या शिवसेनेच्या जागेवर भाजपचा दावा

मुंबई पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व केलेले शिंदेंच्या शिवसेनेचे डॉ. दीपक सावंत पुन्हा एकदा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. ते तयारीही करत आहेत. पण, भाजपने या जागेवर दावा केला आहे. आरएसएसशी संबंधित किरण शेलार यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. “मुंबईत आमची मतदार नोंदणी जास्त झाली आहे. भाजप ही जागा २४ वर्षे लढत असून, अंतिम निर्णय समिती घेईल”, असे म्हणत मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेला जागा मिळणार नसल्याचे अप्रत्यक्षपणे संकेत दिले आहेत. “कुणी आणि किती मतदार नोंदणी केली, हे सर्वाधिक महत्त्वाचे आहे. मित्रपक्षांना दुखवायचे नसले, तरी निवडणूक जिंकण्यासाठी लढवायची असते, हे लक्षात घेतले पाहिजे”, असे म्हणत शेलारांनी स्पष्ट ठाम भूमिका घेतली आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

अजित पवारांनी जाहीर केला उमेदवार

मुंबई पदवीधरवरून भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरू असतानाच अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने मुंबई शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवार जाहीर केला आहे. शिवाजीराव नलावडे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. हा मतदारसंघही गेल्यावेळी शिवसेनेकडे होता. त्यामुळे अजित पवारांनी आधीच उमेदवार जाहीर करून सरशी साधली आहे. दोन्ही जागांवर मित्रपक्ष आग्रही असल्याने शिंदेंच्या शिवसेनेची भूमिका काय, याकडे लक्ष लागले आहे.