लाखो प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या निष्ठेसमोर नतमस्तक; चंद्रशेखर बावनकुळे यांचं कार्यकर्त्यांना भावनिक पत्र

0

महाराष्ट्र निवडणूक जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पक्ष विरुध्द इतर पक्ष अशी थेट लढत असताना घरदार विसरून, अथक परिश्रम करून भाजपचे विचार कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना भावनिक पत्र पाठवून कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले आहे.

प्रत्येक गाव-खेड्यापर्यंत मोदीजींच्या विकसित भारताचं स्वप्न घेऊन पोहोचवण्यात तमाम कार्यकर्त्यांचं मोलाचे योगदान लाभलं. राष्ट्रप्रेमानं भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांनी अखंड मेहनत घेवुन भाजपच्या यशाचा बलदंड पाया रचला असून भाजपचे कार्यकर्ते अविश्रांत राबल्यामुळे निवडणुकीत मोठ्या यशाला गवसणी घालणार असल्याचाही विश्वास या पत्रातून व्यक्त करण्यात आलेला आहे. ४ जूनला सर्वजण मिळून जल्लोष करू आणि महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू असे आवाहन करून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा पत्राच्या माध्यमातून विजयाचा विश्वास व्यक्त केला आहे.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना लिहिलेल्या भावनिक पत्रात काय म्हटलंय पाहुयात……

*महाराष्ट्र भाजपा परिवारातील सर्व सहकारी मित्रांनो*

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

सप्रेम नमस्कार

लोकसभा निवडणुकीतील महाराष्ट्रातील सर्व टप्पे सुरळीत पार पडले. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता एका स्वप्नासाठी भारावून जाऊन अहोरात्र काम करीत होता. ते स्वप्न होते, आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनविण्याचे…  विकसित भारताचे…!

या स्वप्नासाठी आपण सर्वांनी अक्षरशः जीवाचे रान केले. घरदार विसरून, अथक परिश्रम करून कोट्यवधी मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या भाजपच्या प्रत्येक  कार्यकर्त्यांचा मला सार्थ अभिमान आहे. मी आपल्या प्रामाणिक निष्ठेसमोर नतमस्तक आहे.

भारतीय जनता पार्टी हा राजकीय पक्ष नाही. ते कुटुंब आहे. आपणा सर्वांचे एकमेकांशी असलेले नाते रक्ताच्या नात्यापलीकडचे आहे. या निवडणुकीत ही आपलुकी, जिव्हाळा मी क्षणोक्षणी अनुभवला. हे सारे क्षण मी माझ्या मनाच्या गाभाऱ्यात जपून ठेवले आहेत. त्याबद्दलची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत.

अधिक वाचा  बळीराजाचा आयुष्य चिंतेच अन् दादा तिकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात लावणी…. महिलेचे ठुमके…. मस्त चाललय तुमचं!

या निवडणुकीचा प्रवास बूथ समित्यांपासून सुरू झाला आणि तो लाखोंच्या सभांपर्यंत विस्तारत गेला. खुद्द आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांचे भक्कम पाठबळ आपल्यासोबत होते. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली प्रत्येक सभेचे नियोजन, रोजच्या प्रचाराची आखणी यासाठी आपण कार्यकर्त्यांनी किती बैठका घेतल्या असतील याची गणतीच नाही.

बूथ समिती, शक्ती केंद्र प्रमुख, विस्तारक, सुपर वॉरियर्स, सोशल मीडिया संयोजक यांच्यासह हजारो कार्यकर्ते, संघटनेतील पदाधिकारी यांच्यासह माझे विधिमंडळातील सर्व आजी- माजी सहकारी निवडणुकीच्या रिंगणात कार्यरत होते.

प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यात आणि प्रत्येक गाव-खेड्यात आपण मोदीजींच्या विकसित भारताचे स्वप्न घेऊन पोहोचलो. राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डाजी, अमित भाई शाह यांनी प्रत्येक पावलावर आपल्याला खंबीर साथ दिली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी जी, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जी आणि राष्ट्रीय स्तरावरील सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनामुळे आपल्या सर्वांचा उत्साह सतत उंचावत गेला.

अधिक वाचा  नेत्यांची प्रसारमाध्यमांत महायुतीची हाक आणि मेळाव्यात ‘एकला चलो’चा नारा भूमिका स्पष्ट नसल्याने इच्छुकांची मोठी अडचण?

मित्रांनो, एक गोष्ट अगदी मनापासून सांगतो, राष्ट्रप्रेमाने भारलेल्या लाखो कार्यकर्त्यांची अखंड मेहनत हाच आपल्या पक्षाच्या यशाचा बलदंड पाया आहे. एकमेकांच्या सुख- दुःखात सहभागी होत, काळजी घेत आपण सर्वजण अविश्रांत राबलात त्यामुळेच आपला पक्ष या निवडणुकीत फार मोठ्या यशाला गवसणी घालणार आहे. हे सारे यश केवळ आणि केवळ तुमचेच राहणार आहे.

आपण या निवडणुकीत घेतलेल्या परिश्रमाबद्दल मी मनापासून कृतज्ञता व्यक्त करीत आहे. किंबहुना ते माझे कर्तव्य आहे. ४ जूनला आपण सर्वजण मिळून जल्लोष करू आणि आपल्या महायुतीचा झेंडा अभिमानाने फडकवू. तुम्हाला जशी आतुरता आहे, तसाच मी देखील उत्सुक आहे.

पुन्हा आपले सर्वांचे मनापासून आभार.

चंद्रशेखर बावनकुळे

अध्यक्ष, भारतीय जनता पार्टी, महाराष्ट्र