१५ वर्षांपूर्वी एका मोठ्या नेत्याने निवडणूक लढवाताना इथं पाणी आणण्याचं वचन दिलं होतं. ते पूर्ण झालं का ? नाही ना ? आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर पुन्हा टीका केली.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. आज राज्यभरात त्यांच्या सभा असून दुपारी माळशिरसमध्ये जाहीर सभा झाली. महायुतीचे उमेदवार रणजित सिंह निंबाळकर हे येथून निवडणूक लढवत आहेत. हायव्होल्टेज लढतीसाठी प्रचार करण्यासाठी पंतप्रधान मोदी मैदानात उतरले आहेत.
माळशिरसमधील सभेत त्यांनी पुन्हा एकदा शरद पवार यांच्यावर टीका केली. तसेच 60 वर्षांत काँग्रेस जे करू शकलं नाही ते आम्ही करून दाखवलं. 25 कोटी लोकांना गरिबीतून मुक्त केलं असं मोदींनी सांगितलं. त्यांनी अतिशय खोचक शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला.
महाराष्ट्रातील जनता भरभरून प्रेम देते, पण वचन पूर्ण नाही केलं तर…
महाराष्ट्रातील जनता जेव्हा प्रेम देते, आशीर्वाद देते तेव्हा काहीच कसर सोडत नाही, भरभरून देते. पण जर कोणी आपलं वचन पूर्ण केलं नाही तर हीच महाराष्ट्राची जनता तेही बरोब्बर लक्षात ठेवते आणि वेळ आल्यावर हिशोब व्यवस्थित चुकता करते, असे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी विरोधकांना इशारा दिला.
शरद पवारांचे नाव न घेता टीका
काल पुण्यातील सभेत नरेंद्र मोदी यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली होती. आज माळशिरसमधील सभेतही त्यांनी पवारांचं नाव न घेता अप्रत्यक्षरित्या त्यांच्यावर निशाणा साधला. 15 वर्षांपूर्वी एक मोठे नेते निवडणूक लढवण्यास येथे आले होते. इथे दुष्काळाने प्रभावित क्षेत्रात पाणी पोहोचवू, अशी शपथ त्यांनी तेव्हा मावळत्या सूर्याच्या साक्षीने घेतली होती. त्यांनी पाणी दिलं का ? नाही ना ? वचन पाळलं नाही ना, आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली आहे, असं मोदी म्हणाले. आज त्या नेत्याची इथून निवडणूक लढण्याची हिंमत नाही, अशा शब्दांत त्यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली.
तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का ?
पंतप्रधान मोदी यांनी माळशिरस येथील सभेत काँग्रेसवर हल्लाबोल करत पुन्हा जोरदार टीका केली. तुमची संपत्ती लुटणारं सरकार हवं आहे का? काँग्रेसवाले संधी मिळाल्यास तुमची संपत्ती वाटणार, असं मोदी म्हणाले..