आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आईसाठी मुलगी ‘देवदूत’ म्हणून समोर आली. गुजरातीमधील अहमदाबाद शहरातून ही घटना समोर आली आहे. गुरुवारी ही घटना घडली. घरगुती वादातून सात वर्षाच्या मुलीच्या आईने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे, आई हे धक्कादायक पाऊल उचलत होती तेव्हा तिच्या सात वर्षाच्या मुलीशिवाय तिथे कोणीही नव्हते.






लहान मुलांसाठी हे गंभीर आघातापेक्षा कमी नसते. तथापि, टाईम्स ऑफ इंडियाच्या अहवालानुसार, या प्रकरणातील मुलीने तिच्या आईच्या दोन्ही मनगटातून रक्तस्त्राव होत असल्याचे पाहिले तेव्हा तिने क्षणाचाही विलंब न लावता आपल्या आईचे प्राण वाचवण्यासाठी धडपड सुरु केली.
मुलीने ॲम्ब्युलन्स हेल्पलाइन नंबर 108 वर कॉल केला. अभयम 181 हेल्पलाइन अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांना एका मुलीचा कॉल आला जिने त्यांना सांगितले की तिच्या आईच्या मनगटातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत आहे.
दरम्यान, पती-पत्नीमधील घरगुती वादातून महिलेने हे कठोर पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच तुरुंगात सुटुन आलेल्या पतीसोबत छोट्या-छोट्या गोष्टीवरुन तिचे वाद व्हायचे. वारंवार होत असलेल्या वादाला कंटाळून महिलेने जीवन संपवण्याचा निर्णय घेतला. मात्र तिच्या मुलीने वेळीच कॉल केल्याने तिचा जीव वाचला. मुलीने तात्काळ हेल्पलाइन नंबरवर कॉल केल्याने तिच्या आईला वाचवता आले. मुलीचा वेळीच फोन आल्याने तिच्या आईला हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आणि तिचा जीव वाचला.











