“मोदींना मंगळसूत्राचं महत्त्व आहे? देशासाठी आईच मंगळसूत्र अर्पित आणि आजीने सोनंही दिल: प्रियांका गांधी

0
1

‘काँग्रेसची नजर आता माता भगिनींच्या मंगळसूत्रावर आहे. त्यांना ते हिसकावून घ्यायचं आहे आणि ज्यांना जास्त मुलं आहेत. त्यांना वाटायचं आहे’, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विधानाचा काँग्रेसच्या नेत्या प्रियांका गांधी यांनी समाचार घेतला. मतांसाठी महिलांना घाबरवत आहेत. त्यांना लाज वाटली पाहिजे, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.

“मागच्या दोन दिवसांपासून हे सुरू झालं आहे की, काँग्रेसला तुमचं मंगळसूत्र आणि सोनं हिसकावून घ्यायचं आहे. ७० वर्षांपासून हा देश स्वतंत्र आहे. ५५ वर्षे काँग्रेसचं सरकार राहिले, कुणी तुमचं सोनं हिसकावून घेतलं का? कुणी तुमचं मंगळसूत्र हिसकावून घेतलं का?”, असा सवाल करत प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना घेरलं.

प्रियांका गांधींनी काय म्हटलं आहे?

“जेव्हा युद्ध झालं होतं, तेव्हा इंदिरा गांधींनी स्वतःचं सोनं देशाला दिलं होतं. माझ्या आईचं मंगळसूत्र या देशासाठी शहीद झालं आहे. आणि जर मोदीजींना मंगळसूत्राचं महत्त्व समजलं असतं, तर ते असे अनैतिक बोलले नसते”, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी मोदींना प्रत्युत्तर दिले.

प्रियांका गांधींनी नोटबंदीच्या मुद्द्यावर बोट ठेवत मोदींना लक्ष्य केले. त्या म्हणाल्या की, “शेतकऱ्यांवर कर्ज होते तेव्हा त्याची पत्नी मंगळसूत्र गहाण ठेवते. मुलांचं लग्न असो वा औषधांची गरज तेव्हा महिला आपले दागिने गहाण ठेवते. या गोष्टी या लोकांना कळत नाही. जेव्हा नोटाबंदी झाली. महिलांची बचत या लोकांनी घेतली आणि यांनी सांगितलं की, बँकेत जमा करा. तेव्हा मोदी कुठे होते. तेव्हा मोदी काय म्हणत होते? त्यावेळी तुमच्याकडून घेत होते.”

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

मोदी तेव्हा कुठे होते? गांधींचा सवाल

“मणिपूरमध्ये जवानाच्या पत्नीचं वस्त्रहरण करून सगळ्यांसमोर फिरवलं. मोदीजी चुप होते. काहीच बोलले नाही. तिच्या मंगळसूत्राबद्दल नाही विचार केला त्यांनी. जेव्हा त्यांनी देशाला सांगितलं की उद्यापासून लॉकडाऊन होईल. आणि सगळे मजूर उत्तर प्रदेश, बिहारसह वेगवेगळ्या ठिकाणांवरून पायी निघाले, कारण यांनी रेल्वे बंद केल्या होत्या. बस बंद केल्या होत्या. जेव्हा जेवायला काही मिळत नव्हतं. काही आधार नव्हता. तेव्हा महिलांनी आपले दागिने गहाण ठेवले, तेव्हा मोदी कुठे होते?”, असा सवाल प्रियांका गांधी यांनी मोदींना केला.

“किसान आंदोलन झाले. ६०० शेतकरी शहीद झाले. त्यांच्या विधवांच्या मंगळसूत्राबद्दल मोदींनी विचार केला का? त्यांची पापणीही हलली नाही आणि आज निवडणुकीत मतांसाठी अशा गोष्टी करून महिलांना घाबरवताहेत. कारण घाबरून त्यांनी मतं द्यावीत. त्यांना लाज वाटली पाहिजे”, असे म्हणत प्रियांका गांधी यांनी मोदींवर पलटवार केला.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

पंतप्रधान मोदी काय म्हणाले?

राजस्थानमधील बांसवाडा येथे झालेल्या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदा संपत्तीच्या सर्वेक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले होते. ते काय म्हणालेले वाचा…

“यावेळचा काँग्रेसचा जाहीरनामा बघा. काँग्रेसने जाहीरनाम्यात जे सांगितलं आहे, ते चिंताजनक आहे. गंभीर आहे. आणि हा माओवाद आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांनी म्हटलं आहे की, जर काँग्रेसचे सरकार आले, तर प्रत्येकांच्या संपत्तीचे सर्वेक्षण केले जाईल. आपल्या बहिणींकडे किती सोने आहे, ते तपासलं जाईल. त्याचा हिशोब केला जाईल.”

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

“आदिवासी कुटुंबाकडे चांदी असते, त्याचा हिशोब केला जाईल. सरकारी नोकरदारांकडे किती संपत्ती आहे, त्याची चौकशी केली जाईल. इतकंच नाही, पुढे काय म्हटलं आहे की, बहिणींकडचे जे सोने आहे आणि इतर जी संपत्ती, ती सगळ्यांना समान पद्धतीने वाटली जाईल.”

“माता भगिनींच्या आयुष्यात सोने दाखवण्यासाठी नसते. ते स्वाभिमानाशी जोडलेले आहे. तिचे मंगळसूत्र फक्त सोन्याच्या किंमतीचा मुद्दा नाहीये. तिच्या जीवनाच्या स्वप्नाशी जोडलेला मुद्दा आहे. तुम्ही ते हिसकावून घेणार असल्याचे सांगत आहात, जाहीरनाम्यात.”

“सोने घेऊन टाकू आणि सगळ्यांना वाटून टाकू. आणि पूर्वी जेव्हा त्यांचे सरकार होते, तेव्हा त्यांनी म्हटले होते की, देशाच्या संपत्तीवर पहिला अधिकार मुस्लिमांचा आहे. याचा अर्थ ही संपत्ती एकत्रित करून कुणाला वाटणार? ज्यांना जास्त मुलं आहेत, त्यांना वाटणार. घुसखोरांना वाटणार. तुमच्या मेहनतीचा पैसा घुसखोरांना दिला जाणार, हे तुम्हाला हे मान्य आहे का?”, असे मोदी म्हणालेले.