मेट्रोने प्रवास करताना सगळ्यात कंटाळवाणी गोष्ट म्हणजे तिकीटांसाठी रांगेत उभं राहणं. अगदी मशीनने स्वतःच तिकीट काढायचं म्हटलं तरी त्यात थोडा वेळ जातोच. शिवाय मेट्रोचं तिकीट किंवा टोकन हरवण्याची भीती वेगळीच. यामुळेच मुंबई मेट्रोने आता प्रवाशांसाठी एक हटके पर्याय उपलब्ध केला आहे.
वर्सोवा-अंधेरी-घाटकोपर मेट्रो १ मार्गावर प्रवास करणाऱ्या ४ लाख प्रवाशांना लवकरच तिकिटाचा नवा पर्याय उपलब्ध होणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने नवीन प्रकारच्या तिकीट प्रणाली लॉन्च केली आहे. या नव्या प्रणालीमध्ये आता फक्त क्यूआर-कोडेड रिस्टबँड (मनगटी बँड) स्कॅन करून मेट्रो १ मधून प्रवास करता येणार आहे.
यामुळे प्रवाशांना कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज भासणार नाही. हे टॅपटॅप बॅटरीशिवाय कार्य करेल, टॅपटॅप रिस्टबँड वॉटरप्रूफ असेल. तसेच हे नॉन-एलर्जीक असेल, ज्याची किंमत २०० रुपये इतकी असणार आहे.