सातारा लोकसभा मतदारसंघासाठी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निश्चित होत नाही. दररोज एका नेत्याचे नाव पुढे येत आहे. अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज मुंबईत राष्ट्रवादीचे नेते व खासदार शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सातारा लोकसभेची निवडणूक लढण्याची इच्छा पवारांपुढे व्यक्त केली आहे. त्यामुळे शिंदेंचा शिलेदार साताऱ्यातून लढताना पवारांची तुतारी हाती घेणार का, याची उत्सुकता आता ताणली आहे.
सातारा लोकसभेची महाविकासची जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला आहे. त्यामुळे पवारांनी उमेदवार निश्चितीसाठी बैठकांचा सिलसीला सुरु ठेवला आहे. सिल्वर ओक या निवासस्थानी हालचालींना वेग आला आहे. येत्या एका दोन दिवसात साताऱ्याचा उमेदवार खासदार शरद पवार जाहीर करणार आहेत. पण, राष्ट्रवादीतून तुतारीच्या चिन्हावरच उमेदवार द्यावा अशी आग्रही मागणी पदाधिकारी व कार्यकर्ते करत आहेत. त्यामुळे पक्षाबाहेरचा उमेदवार देताना त्याला पक्षात घेऊनच उमेदवारी द्यावी लागणार आहे. अशा वेळी पृथ्वीराज चव्हाण यांनीही तुतारीच्या चिन्हावर लढण्यास नकार दिल्याने त्यांचे नाव मागे पडले आहे. सध्या साताऱ्यासाठी पुन्हा श्रीनिवास पाटील किंवा शशिकांत शिंदे यांच्यापैकी एकाचे नाव निश्चित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हालचाली सुरु असतानाच आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सातारचे जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी आज सिल्वर ओक या खासदार पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यात तासभर सातारा लोकसभेबाबत चर्चा झाली. यावेळी पुरुषोत्तम जाधव यांनी मागील दोन निवडणुकांत त्यांनी सातारा लोकसभा मतदारसंघातून किती मते घेतली होती. याची माहिती श्री. पवार यांना दिली. तसेच महायुतीकडून त्यांना डावलले जात असल्याने त्यांना महाविकास आघाडीची आता आशा वाटत असल्याचे सांगून साताऱ्यातून लढण्यास तयार असल्याचे सांगितले. साताऱ्यातून राष्ट्रवादीचा उमेदवार ठरत नसताना नेमके पुरुषोत्तम जाधव पवारांना भेटल्याने आता या निवडणुकीत वेगळाच व्टिस्ट निर्माण झाला आहे.
पुरुषोत्तम जाधव म्हणाले, मी 2009 व 2014 मध्ये सातारा लोकसभा लढलो आहे. 80 वर्षांचा योद्धा शरद पवार हे कुस्तीवर प्रेम करणारे असून मीही कुस्तीवर प्रेम करणारा आहे. 2009 मध्ये सेना भाजपचा उमेदवार होतो. 2014 मध्ये मी अपक्ष लढताना मला मोदींच्या लाटेत मला देशातील दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. 2019 मध्ये मला थांबविण्यात आले. सातारा जिल्हा विकासापासून वंचित असून या व्यथा सोडविण्यासाठी निवडणूक लढली पाहिजे. मी सर्वांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. त्यामुळे मला उमेदवारी मिळेल. कोणतरी मला नक्कीच उमेदवारी देईल, अशी आशा आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ही भेटलेलो आहे. आता खासदार शरद पवार यांची भेट घेतली आहे. आता साताऱ्यात क्रांती करण्याची संधी मला शरद पवार देतील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
पुरुषोत्तम जाधव हे शिंदे गट शिवसेनेचे जिल्हा प्रमुख असून त्यांना राष्ट्रवादीकडून निवडणूक लढताना शिवसेनेच्या पदाचा त्याग करावा लागणार आहे. तसेच राष्ट्रवादीची तुतारी घेऊनच लढावे लागेल. तसेच बाहेरचा उमेदवार म्हणून त्यांना राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांची किती साथ मिळेल हा देखील प्रश्न आहे. त्यामुळे पुरुषोत्तम जाधव यांच्याबाबत खासदार शरद पवार कोणता निर्णय घेणार याची उत्सुकता आहे.