…तुमची काय औकात होती? भाजप खासदार आमदारात वाद भडकला!

0

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने काल दिलेल्या एका जाहिरातीवरून शिंदे गट आणि भाजपमध्ये वादाचा भडका उडाला आहे. या जाहिरातीवरून भाजपने नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरच निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे शिंदे गटानेही भाजपला जसेच्या तसे उत्तर दिलं आहे. एवढेच नव्हे तर राज्य मंत्रिमंडळातील भाजपचं अस्तित्व केवळ शिंदे गटामुळेच असल्याचंही शिंदे गटाने दाखवून दिलं आहे. त्यामुळे दोन्ही पक्षात चांगलीच ठणाठणी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी जाहिरातीवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर अत्यंत खोचक टीका केली होती. बेडूक कितीही फुगला तरी हत्ती होत नाही, असं सांगतानाच मुख्यमंत्र्यांना ठाणे म्हणजेच महाराष्ट्र वाटत असल्याचा हल्लाबोल अनिल बोंडे यांनी केला होता. बोंडे यांच्या या टीकेला शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी जशास तसे उत्तर दिलं आहे. शिवसेना आणि एकनाथ शिंदे हे वाघ आहेत.आणि 50 वाघांमुळेच भाजपच्या मंत्र्यांना मंत्रिमंडळात स्थान आहे, असं जोरदार प्रत्युत्तर संजय गायकवाड यांनी दिलं आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

मुख्यमंत्र्यांची वाहवा जर जनता करत असेल तर ते कटू सत्य पचविण्याची ताकत राजकीय नेत्यांनी ठेवावी. सुरुवातीला भाजपचे दोनच खासदार होते, आज त्यांचे 300 च्यावर खासदार झाले आहेत. आमच्या नेत्याबद्दल अशी भाषा करत असतील तर वरिष्ठ नेत्यांनी लक्ष घालावं, असं आवाहन संजय गायकवाड यांनी केलं आहे.

कुणामुळे मोठे झाला?
भाजपकडून शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करण्यात येत आहे. त्यावरूनही गायकवाड यांनी भाजपला दम भरला आहे. शिवसेनेच्या मतदारसंघात हस्तक्षेप करणे थांबवा. तुम्ही कोणाच्या संगतीने मोठे झालात याचाही विचार करा. बाळासाहेब ठाकरेंचे बोट पकडून आपण मोठे झाला आहात. नाहीतर आपली काय औकात होते हे लक्षात ठेवले पाहिजे, असं सांगतानाच अनिल बोंडे यांनी बोलताना आत्मचिंतन करून बोलावं, असा सल्लाही त्यांनी दिला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

अनिल बोंडे काय म्हणाले?
भाजपचे खासदार अनिल बोंडे यांनी याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. बेडूक कितीही फुगवला तरी हत्ती होत नाही हे लक्षात ठेवा, असं म्हणत बोंडे यांनी मुख्यमंत्र्यांना डिवचले होते. शिंदे गटाने सर्व्हे कुठे केला? कधी केला? असा सवाल करत ठाणे म्हणजे महाराष्ट्र आहे काय? असा चिमटाही त्यांनी काढला होता. तसेच देवेंद्र फडणवीस यांना अख्खा महाराष्ट्र ओळखतो. त्यांचं महाराष्ट्रभर काम असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं.