राष्ट्रवादीचा कुटुंबाबाहेरचा सर्वोच्च नेता! कोण आहेत प्रफुल्ल पटेल?; ९० पासून पवारांची साथ

0

केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेलांना राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे. यामुळे पक्षातील पवारांचे उत्तराधिकारी म्हणून सुप्रिया सुळेंसोबत प्रफुल्ल पटेल यांचं नाव निश्चित झालं आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेच्या आधीपासूनच ते शरद पवारांच्या सोबत आहेत. त्यामुळे पवार कुटुंबाबाहेरील राष्ट्रवादीचा सर्वोच्च नेता म्हणूनही पटेल यांना ओळखलं जातं. आज राष्ट्रवादी काँग्रेसचा वर्धापन दिन साजरा होत असताना पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्षांची घोषणा केली. यामध्ये प्रफुल्ल पटेल यांच्या नावाची वर्णी लागली. शरद पवारांनी जेव्हा काँग्रेस सोडून राष्ट्रवादी पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा पवारांसोबत पटेल यांनीही काँग्रेसला रामराम ठोकला होता. मात्र, पटेल हे त्यापूर्वीपासूनच पवारांसोबत राहिले आहेत.

कोण आहेत प्रफुल्ल पटेल?

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या जवळच्या दोन व्यक्ती म्हणजे शरद पवार आणि मनोहरभाई पटेल. प्रफुल्ल पटेल हे याच मनोहर भाईंचे सुपुत्र. चव्हाणांच्या घरी जेव्हा यां नेत्यांच्या बैठका होत, तेव्हा कित्येक वेळा मनोहरभाई प्रफुल्ल यांना घेऊन जात. प्रफुल्ल पटेल अवघ्या १३ वर्षांचे असताना मनोहरभाईंचं निधन झालं. यानंतर प्रफुल्ल यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं. मुंबई विद्यापीठातून त्यांनी कॉमर्समधून पदवी घेतली.

अधिक वाचा  श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी मनोज खैरे नियुक्त

राजकीय प्रवास

शिक्षण पूर्ण केल्यानंतर पुन्हा एकदा शरद पवारांसोबत येत प्रफुल्ल पटेलांनी राजकारणात प्रवेश केला. यावेळी शरद पवारांच्या जवळचे मानले जाणारे दोनच नेते होते. सुरेश कलमाडी आणि प्रफुल्ल पटेल. मात्र, ९० च्या दशकात काही कारणामुळे कलमाडी आणि पवार यांच्यात दुरावा वाढला. अशा वेळी प्रफुल्ल यांनी मात्र पवारांची साथ सोडली नाही.

प्रफुल पटेल यांनी आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल टाकत राजकीय वाट धरली. १९८५ साली गोंदिया नगरपरिषदेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले. त्यानंतर १९९१ साली झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये बाजी मारून १०व्या लोकसभेवर ते निवडून गेले. पुढे १९९६ आणि १९९८ साली ते अनुक्रमे ११व्या आणि १२व्या लोकसभेवर निवडून गेले. पटेल यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये कित्येक संसदीय समित्यांमध्ये भूमिका बजावली. २००० साली महाराष्ट्राचे प्रतिनिधी म्हणून त्यांची राज्यसभेवर निवड करण्यात आली. २००६ साली पुन्हा एकदा ते राज्यसभेवर निवडून आले. २००९ साली १५व्या लोकसभेसाठी त्यांची पुन्हा एकदा निवड झाली. पुढे २०१६ साली परत ते राज्यसभेवर निवडून गेले.

अधिक वाचा  हैदराबाद गॅझेट जीआरला तात्काळ ‘स्थगिती’स सुप्रीमचा नकार; आता मुंबई उच्च न्यायालयात नियमित सुनावणी होणार

२००४ ते २०११ या दरम्यान ते नागरी विमान वाहतूक मंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात सरकारने देशांतर्गत विमान सेवा क्षेत्रातील थेट विदेशी गुंतवणूक ४० टक्क्यांवरून ४९ टक्क्यांवर नेली होती. यानंतर त्यांची नियुक्ती अवजड उद्योग आणि सार्वजनिक उपक्रम मंत्री या पदावर करण्यात आली.

केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक पदांवर प्रफुल पटेल यांनी काम केलं आहे. २०१२ ते २०२२ पर्यंत ते भारतीय फुटबॉल फेडरेशनचे अध्यक्ष होते. मात्र, या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप असल्यामुळे, २०२२ साली त्यांना पदमुक्त करण्यात आले. या व्यतिरिक्त ‘पटेल चॅरिटेबल ट्रस्ट’, गोंदिया शिक्षण संस्था, गोंडवाना क्लब, नागपूर लायन्स इंटरनॅशनल क्लब, क्रिकेट क्लब ऑफ मुंबई, मुंबई क्रिकेट असोसिएशन या सर्व संस्थांचे ते चेअरमन आहेत.

अधिक वाचा  मारणे टोळी सूत्रधार रुपेश मारणेच्या मुसक्या आवळल्या; भाजप कार्यकर्त्याला मारहाण ९ महिने होता फरार

राष्ट्रवादीचे कार्यकारी अध्यक्ष

यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून प्रफुल्ल पटेलांची निवड करण्यात आली आहे. शरद पवारांनी याबाबत घोषणा केल्यानंतर पटेलांनी माध्यमांशी संवाद साधला. “सुरुवातीपासून मी राष्ट्रीय पातळीवर काम करत आलो आहे. मी पहिल्यापासून राष्ट्रवादीची जबाबदारी सांभाळत आलो आहे. शरद पवारांनी दिलेली कोणतीही जबाबदारी आजपर्यंत मी पार पाडत आलो, यापुढेही पार पाडणार आहे.” अशा शब्दांमध्ये त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.