राज्यातील बहुचर्चित सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निकाल सोप्या भाषेत समजावून सांगण्याची अभिनव मोहीम राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आजपासून सुरू केली. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल सामान्य नागरिकांना पूर्णपणे वाचता येत नाही. त्यामुळे या निकालाचे शब्दशः वाचन करून ते मराठीमध्ये समजावून सांगत शिंदे-फडणवीस सरकार हे कसे बेकायदा, अनैतिक आहे, यावर राज्यस्तरीय मोहीम राष्ट्रवादीने आजपासून सुरू केली.






पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या पुढाकाराने ‘चला या… सर्वोच्च न्यायालयाचा निकाल समजून घेऊया’ या परिसंवादात जितेंद्र आव्हाड यांनी आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत या मोहिमेची सुरुवात केली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी सोप्या भाषेत निकालाचे विश्लेषण करून सांगितले. शिवाय व्हीप कुणाचा लागू होतो आणि हे सरकार कसे असांविधानिक आहे याचे दाखले सर्वोच्च न्यायालयाने या निकालात स्पष्टपणे दिल्याचे त्यांनी सप्रमाण स्पष्ट केले.
आव्हाड म्हणाले, की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात हा संपूर्ण निकाल असून केवळ घटनात्मक स्वायत्त संस्थांच्या कार्यक्षेत्रावर आक्रमण नको म्हणून या बेकायदा सरकारच्या घटनात्मक वैधतेची जबाबदारी विधानसभा अध्यक्षांकडे दिली आहे. ऑगस्टच्या अखेरपर्यंत विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा आधार घेत या सरकारच्या विरोधातच निवाडा द्यावा लागेल, असा दावा आव्हाड यांनी केला.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाच्या ५० हजार पुस्तिका काढून लोकांपर्यंत पोचविणार असल्याचेही आव्हाड यांनी जाहीर केले. या कार्यक्रमाला पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, कोषाध्यक्ष हेमंत टकले, महिला प्रदेशाध्यक्षा विद्या चव्हाण, राष्ट्रीय प्रवक्ते नरेंद्र वर्मा आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.











