राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय आखणी करत आहेत. त्याच अनुषंगाने आज पुणे दौऱ्यात पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अजित पवारांनी राजकीय भूमिका मांडली. यावेळी, नाव न घेता त्यांची आपल्या चुकांवर पांघरुन घालायला आधी साहेब होते, आता आपल्यालाच पांघरुन घालायचे आहे, असे म्हणत शरद पवारांची आठवण काढली. तसेच, कार्यकर्त्यांना सबुरीने वागण्याचा सल्लाही अजित पवारांनी दिला.






ज्याच्यामध्ये इलेक्टीवमेरिट असेल त्याला आपण तिकीट देऊ, शंकर मांडेकरला पक्ष सोडायचा नव्हता तो आपल जुना कार्यकर्ता आहे. पण त्याला दुसरीकडे जावं लागलं. तर, शिरूरमध्ये माझी भावकी मला सोडून गेली. अशोक पवार पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होते, त्याला वाटत होतं की तुम्ही दादासोबत गेले, आपण इकडे राहून मंत्री आणि पालकमंत्री करू. मात्र, मी त्याला सांगितलं होतं की तू मला सोडून गेला आता तुला पडणार, आणि अशोक पवारला मी पाडलं, असा किस्सा अजित पवारांनी सांगितला. सुनील शेळके यांना देखील आपल्याच लोकांनी टार्गेट केलं पण तो देखील बाबा निवडून आला. सगळ्यांना विनंती आहे, ज्याच्या सोबत राहायचं त्यांच्या सोबत निष्ठेने राहा. दोन-तीन ठिकाणी राहू नका, हातात काहीच राहणार नाही, निष्ठेला आणि ध्येयाला महत्त्व द्या, असा सल्ला अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
महायुतीत की स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेऊ
आपण महायुतीमध्ये जरी असलो तरी, आधी महाविकास आघाडी असताना स्थानिक निवडणुका स्वतंत्र लढत होतो आणि गरज पडली तर एकत्र येत होतो आताही तशी वेळ येऊ शकते. सगळ्यांना आपला पक्ष, आपली संघटना वाढवण्याचा अधिकार आहे. त्यामुळेच, जनसंवाद आणि परिवार मिलन हा कार्यक्रम आपला सुरूच असणार आहे. परिवार मिलन करत अनेक कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन मला दोन घास खायचे आहेत, त्यांचे दुःख समजून घ्यायचे आहे, असेही अजित पवारांनी म्हटले. वरवरचं काम करू नका, जनतेच्या प्रश्नाकरता त्यांच्या घरापर्यंत जा, आपल्याला काम करावं लागणार आहे.
आपल्याला दिल्लीमध्ये जाऊन कुणाला काही विचारून काम करायची गरज नाही. काँग्रेस, भाजप, पवार साहेबांच्या पक्षांमध्ये त्यांचे नेते दिल्लीत असतात, म्हणून त्यांना दिल्लीमध्ये जाऊन विचारावा लागेल असं मी म्हणालो होतो, पण याचाही वेगळा अर्थ काढण्यात आला. मला आता जास्त वेळ राज्यात द्यावा लागणार आहे, फिरावं लागणार आहे, तुमच्यावरही महत्त्वाची जाबाबदारी असणार आहे ती नीट पार पाडा, असा सल्लाही अजित पवारांनी कार्यकर्त्यांना दिला.
अजित पवारांना शरद पवारांची आठवण
मागचा अजित पवार आणि आत्ताचा अजित पवार लय मोठा फरक आहे, माझ्याकडे यायला संकोच करू नका. जसं वय वाढतं, तसं फरक होतो. वय वाढलं की मॅच्युरिटी येते, आपण आधी काही केलं तर आपल्याला पांघरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांघरून घालायचा आहे, असे म्हणत अजित पवारांनी शरद पवारांच्या आठवणी जागवल्या. यावेळी, अजित पवारांचे भाषण सुरू असताना एक कार्यकर्ता ओरडला, दादा चुलता आणि पुतण्याचं नातं… त्यावर अजित पवारांनी मध्येच त्याला थांबवलं आणि म्हणाले, चुलता पुतण्याचं मला नको सांगू, आधीचे नको सांगू आणि आताचंही नको सांगू. यावेळी, एकच हशा पिकला. कुणी काही वक्तव्य करतात ते वाईट बोलले म्हणून आपण वाईट पद्धतीने उत्तर द्यायचं ही आपली शिकवण नाही, राजकारण सुसंस्कृतपणाने करा, हा विचार जपा. लोक काही बोलतील तर विनाशकालीन विपरीत बुद्धी म्हणा आणि पुढे निघून जा, महत्व देऊ नका, असा सल्लाही त्यांनी दिला.










