दरवेळी गांधी परिवारावर टीका, 11वर्षे सत्ता स्वत:ची आतातरी जबाबदारी घ्या; प्रियांका गांधींचा भाजपवर हल्लाबोल

0

भाजपला गांधी परिवारावर टीका करण्यासाठी फक्त बहाणा हवा असतात. तो मिळाला की, भाजप गांधी परिवाराचा इतिहास उगाळत बसतो. गेली 11 वर्षे देशावर भाजपची सत्ता आहे.किमान आतातरी नेहरु-गांधींना दोष देण्याऐवजी स्वत:ची जबाबदारी घ्यायला शिका, अशा सडेतोड भाषेत काँग्रेस खासदार प्रियांका गांधी यांनी सत्ताधाऱ्यांना प्रत्युत्तर दिले. ऑपरेशन सिंदूरबाबत लोकसभेत आयोजित करण्यात आलेल्या चर्चेवेळी आज सकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विरोधकांवर आगपाखड केली. ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय सैन्याच्या कारवाईबाबत प्रश्न उपस्थित करणारे विरोधक कसे पाकिस्तानधर्जिणे आहे, काँग्रेसच्या काळात नेहरुंच्या चुकीमुळे पाकव्याप्त काश्मीर पाकिस्तानकडे कसा केला, चीनने आपला भूभाग कसा बळकावला, असा काँग्रेसच्या चुकांचा पाढा अमित शाह यांनी वाचला. त्यानंतर प्रियांका गांधी भाषणाला उभ्या राहिल्या आणि त्यांनी या सगळ्या आरोपांना प्रत्युत्तर दिले. प्रियांका गांधी यांच्या भाषणावेळी भाजपच्या खासदारांकडून काँग्रेस आणि गांधी घराण्याने काय केलं, असा सवाल विचारण्यात आला. त्यावर प्रियांका गांधी यांनी म्हटले की, ‘तुम्ही इतिहास उगाळत बसा, मी वर्तमानात जगणारी आहे’.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

आपल्या भाषणात प्रियांका गांधी यांनी केंद्र सरकारला काही मुलभूत प्रश्न विचारले. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि अन्य सदस्यांनी केलेली भाषणं मी ऐकली. मात्र, या सगळ्यात मला एकच गोष्ट खटकली. अनेकांनी ऑपरेशन सिंदूर, दहशतवाद, राष्ट्रीय सुरक्षा आणि इतिहासाचे धडे दिले. पण या सगळ्या भाषणांमधून एक गोष्ट निसटली. 22 एप्रिल रोजी बैसरन खोऱ्यात 26 भारतीयांना मारण्यात आले. तो हल्ला कसा झाला आणि का झाला? पहलगाममध्ये दहशतवादी काय करत होते? केंद्र सरकार प्रचार करत असते की, काश्मीरमध्ये आता शांतता आहे, दहशतवाद संपला आहे. पंतप्रधान सांगतात की,काश्मीरला जा, तिकडे जमिनी खरेदी करा. मग पहलगाममध्ये दहशतवाद हल्ला कसा झाला? असा हल्ला होणार, याची माहिती देणारी एकही यंत्रणा आपल्याकडे नव्हती का? हे आपल्या यंत्रणांचं अपयश नाही का? हे आपल्या सुरक्षा यंत्रणांचं खूप मोठं अपयश आहे. याची जबाबदारी कोण घेणार? या हल्ल्याने इंटेलिजन्स ब्युरोच्या प्रमुखांनी राजीनामा दिला का? देशाच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला का?, असा सवाल प्रियांका गांधी यांनी उपस्थित केला.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

प्रियांका गांधी यांनी आपल्या भाषणात पहलगाम हल्ल्यात मृत्यू झालेल्या कानपूरचे रहिवासी शुभम द्विवेदी यांचा उल्लेख केला. सहा महिन्यांपूर्वी शुभमचे लग्न झाले होते. त्यांचे कुटुंब गुणागोविंदाने राहत होते. त्यांचा व्हिडीओ पाहून आजही काळीज विदीर्ण होते. शुभम आपल्या पत्नीसोत काश्मीरला गेला होता. 22 एप्रिलला बैसरन व्हॅलीत चांगले वातावरण होते. तिथे जायची वाट सोपी नाही. बैसरन व्हॅलीत जंगलातून आणि डोंगरातून चढत जावे लागते. तिकडे 22 एप्रिलला लहान मुलं खेळत होती. काहीजण झिपलाईन करत होते. लोक मजेत होते. शुभम आणि त्यांची पत्नी एका स्टॉलवर मजेत उभे होते. तेव्हा समोरच्या जंगलातून अचानक दहशतवादी आले आणि त्यांनी शुभमला मारले. त्यानंतर एक तास दहशतवादी बैसरन व्हॅलीत लोकांना टिपून टिपून त्यांच्या कुटुंबीयांसमोर ठार मारत होते.

शुभम द्विवेदी यांची पत्नी म्हणाली की, ‘मी माझं जग डोळ्यांसमोर संपताना पाहिलं आहे. या संपूर्ण वेळात तिथे एकही सुरक्षारक्षक नव्हता. देश आणि सरकारने आम्हाला अनाथ सोडलं होतं. तिथे सुरक्षा का नव्हती? एक सैनिक का नव्हता? सरकारला माहिती नव्हतं का, इथे रोज पर्यटक येतात. इथे येताना जंगलातून यावं लागतं, काही झालं तर लोक बाहेर कसे पडणार, हा विचार सरकारने केला नव्हता का? त्याठिकाणी साध्या प्राथमिक उपचारांची सोय नव्हती, किंबहुना कसलीच व्यवस्था नव्हती. या लोकांना देवाच्या भरवशावर सोडून देण्यात आले होते. नागरिक सरकारच्या भरवशावर तिकडे गेले आणि सरकारनेच त्यांना देवाच्या भरवशावर सोडून दिले. मला विचारायचं आहे की, ही कोणाची जबाबदारी आहे? नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान, गृहमंत्री आणि एनएसएसची नाही का? पहलगाम हल्ल्यापूर्वी दोन आठवडे आधी गृहमंत्री अमित शहा काश्मीरला गेले होते, कशासाठी तर सुरक्षाव्यवस्थेचा आढावा घ्यायला’, याकडे प्रियांका गांधी यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन