३० कोटींच्या फसवणुकीप्रकरणी गुन्हा दाखल; माजी आमदार संजय जगताप यांच्या कुटुंबाच्या बनावट सह्यांचा वापर

0

पुरंदरचे माजी आमदार संजय जगताप आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांच्या बनावट सह्यांचा वापर करून ३० कोटी रुपयांचे कर्ज घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्ह्याची FIR दाखल करण्यात आली आहे.

तक्रारदार राजवर्धिनी संजय जगताप (वय ४३) या सासवड येथील रहिवासी असून, Silver Jubilee Motors या कंपनीच्या कार्यकारी संचालिका आहेत. २०१२ ते २०१७ दरम्यान कंपनीने Reliance Commercial Finance Ltd. कडून २९ कोटींचे ९ व्यवसायिक कर्ज घेतले होते. सर्व कर्जे २०१८ पर्यंत फेडल्याचे कागदपत्राद्वारे स्पष्ट झाले आहे.

मार्च २०२४ मध्ये राजवर्धिनी यांना कोर्टाकडून नोटीस आली की कंपनीच्या मालकीची मालमत्ता थकीत कर्जामुळे जप्त करण्यात येत आहे. ही बाब धक्कादायक असल्याने त्यांनी कोर्टातून कागदपत्रे मागवली असता समोर आले की डिसेंबर २०१८ मध्ये ३० कोटींचे नवीन कर्ज घेतल्याचे दाखवले गेले आहे, तेही त्यांच्या संमतीशिवाय.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

या नव्या कर्जासाठी संजय जगताप, अनंदीबाई जगताप, राजवर्धिनी, राजेंद्र जगताप, अस्मिता जगताप, किरणपालसिंग अहलुवालिया, मनमोहनसिंग अहलुवालिया यांच्या बनावट सह्या वापरण्यात आल्या होत्या.

ज्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, त्यामध्ये मनीष एकनाथ मोरांकर (वय ५२), रहिवासी विशालनगर, पिंपळे निलख, शकील नदाफ (वय ५५), रहिवासी मुंबई आणि अज्ञात दोन व्यक्ती असा समावेश आहे. हे दोघेही त्या काळात संबंधित वित्त कंपनीमध्ये कर्ज व्यवहार हाताळत होते.

तक्रार प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी प्राथमिक तपास केला. बँक स्टेटमेंट आणि कर्ज फेडीची पडताळणी केल्यानंतर गुन्हा नोंदवण्यात आला. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते करत आहेत.

अधिक वाचा  नवे सरन्यायाधीश म्हणून यांच्या नावाची आज शिफारस; सरन्यायाधीश CJI भूषण गवईंनी नावही सांगितले

बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक रविंद्र गायकवाड म्हणाले, “तपास सुरू असून, संबंधित व्यक्तींवर कायदेशीर कारवाई केली जाईल.”