विधान परिषदेच्या तीन उमेदवारी घोषणा भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आली असून महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची घोषणा होणे बाकी आहे. एका नावावर एकमत होत नसल्याने राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या उमेदवारांच्या घोषणेला विलंब होत असल्याची माहिती आहे. राष्ट्रवादीकडून उमेदवारीसाठी चर्चेत आलेले उमेश पाटील यांच्या नावाला पक्षातील एका बड्या नेत्याने विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे, त्यामुळे राष्ट्रवादीची आमदारकी कोणाला मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. दरम्यान, छगन भुजबळ यांची नाराजी दूर करण्यासाठी ऐनवेळी भुजबळ कुटुंबातही उमेदवारी दिली जाऊ शकते.






राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य राजेश विटेकर हे विधानसभेवर निवडून गेले आहेत, त्यामुळे त्यांच्या जागी कोणाला उमेदवार द्यायची, यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात एकमत होत नसल्याने अद्यापही उमेदवार जाहीर झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून माजी आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार संजय दौंड आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांच्या नावाची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतेमंडळींनी माजी आमदार झिशान सिद्दिकी, माजी आमदार संजय दौंड आणि उमेश पाटील यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे गोळा करण्यास सांगितले हेाते. त्यानुसार हे तिघे कामाला लागले होते. मात्र यातील उमेश पाटील यांच्या नावाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील एक बड्या नेत्याने तीव्र विरोध केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
उमेश पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या मोहोळमधील उमेदवाराचे काम केले होते. मोहोळमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आणि तत्कालीन आमदार यशवंत माने यांचा पराभव झाला होता. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर उमेश पाटील हे पुन्हा अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता, त्यामुळे पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात काम केल्याचा ठपका त्यांच्यावर येऊ शकतो.
दरम्यान, झिशान सिद्दिकी यांच्या नावालाही राष्ट्रवादीतील काहींनी विरोध केला आहे. त्यामुळे शेवटच्या क्षणी कोणाचे नाव अंतिम होते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. सिद्दिकी आणि पाटील यांच्या नावावर पक्षात एकमत न झाल्यास या तीन नावाव्यतिरिक्त वेगळेच नाव उद्या सकाळी जाहीर होऊ शकते. त्यामुळे राष्ट्रवादीच्या नावाची उत्सुकता वाढली आहे.
भुजबळांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होणार
मंत्रिमंडळात स्थान मिळाल्याने ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे पक्षात नाराज आहेत. मात्र, गेल्या काही दिवसांपासून त्यांचा आक्रमक स्वभाव काहींसा मवाळ झाला आहे. अर्थसंकल्पावर भाषण करताना त्यांनी जयंत पाटील यांना सुनावणात अर्थमंत्री अजित पवारांसाठी विधानसभेत जोरदार बॅटिंग केली होती. भुजबळांची नाराजी कमी करण्यासाठी त्यांचे पुतणे समीर भुजबळ यांनाही संधी दिली जाऊ शकते. आगामी मुंबई महापालिका डोळ्यासमोर ठेवून समीर भुजबळ यांना ताकद दिली जाऊ शकते. त्यामुळे ऐनवेळी समीर भुजबळ यांचेही नाव पुढे येऊ शकते











