प्रयागराजमध्ये होत असलेल्या महाकुंभमध्ये अभिनेत्री ममता कुलकर्णीने संन्यास घेतला होता. संन्यास घेतल्यानंतर तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर पद दिलं होतं. यावरून अनेकांनी तीव्र विरोध केला होता. ममताला महामंडलेश्वर बनवल्यानंततर किन्नर अखाड्यात मोठा संघर्ष सुरू झाला. त्यानंतर आता ममताला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यात आलं आहे. त्याचसोबत लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांना आचार्य महामंडलेश्वर पदावरून काढून टाकण्यात आलं आहे. या दोघांनाही किन्नर अखाड्यातून काढून टाकण्यात आलं आहे. किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांनी ही कारवाई केली आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि ममता कुलकर्णी यांना पदावरून काढून टाकल्यानंतर आता किन्नर अखाड्याची पुनर्रचना केली जाणार आहे. लवकरच नवीन आचार्य महामंडलेश्वरची घोषणा होईल, अशी माहिती अजय दास यांनी दिली.






ममता कुलकर्णी तब्बल 25 वर्षांनंतर भारतात परतली. भारतात आल्यानंतर उत्तर प्रदेशातील प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभ 2025 मध्ये तिने पिंडदान करत संन्यास घेतला होता. त्यानंतर एका भव्य पट्टाभिषेक कार्यक्रमात तिला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर बनवण्यात आलं. महामंडलेश्वर बनल्यानंतर ममताला श्री यमाई ममता नंदगिरी असं नाव देण्यात आलं होतं. मात्र या सर्व घटनेवरून इतर साधूसंतांनी प्रश्न उपस्थित केले होते. एका महिलेला किन्नर अखाड्याचं महामंडलेश्वर का बनवण्यात आलं, यावरून वाद सुरू झाला.
किन्नर आखाड्याचे संस्थापक ऋषी अजय दास यांचा आरोप
‘ज्या धर्म प्रचार-प्रसार आणि धार्मिक कर्मकांडासोबत किन्नर समाजाची प्रगती व्हावी या हेतूने त्यांची (लक्ष्मी नारायण त्रिपाठी) नियुक्ती करण्यात आली होती, त्यावरून ते सर्वार्थाने भरकटले आहेत. त्यांनी माझ्या परवानगीशिवाय जुना अखाडासोबत एक लिखित करार 2019 च्या प्रयागराज कुंभमध्ये केला होता. हे केवळ अनैतिकच नाही तर एक प्रकारची फसवणूक आहे. लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी सनातन धर्म आणि देश हिताचा विचार सोडून देशद्रोह प्रकरणातील ममता कुलकर्णीसारख्या महिलेला, जी फिल्म आणि ग्लॅमरशी जोडलेली आहे, तिला कोणत्याही धार्मिक आणि अखाड्याची परंपरा मानत वैराग्याच्या दिशेने जाऊ देण्याऐवजी थेट महामंडलेश्वरची उपाधी दिली आणि पट्टाभिषेक केला,’ असा आरोप ऋषी अजय दास यांनी केला आहे.
“किन्नर अखाड्याचे लोक शंकर आणि पार्वती यांच्या अर्धनारेश्वर अवताराचं प्रतिनिधीत्व करतात. 23 वर्षांच्या अध्यात्मिक प्रवासानंतर अशा अखाड्याचं महामंडलेश्वर बनणं म्हणजे मला जणू ऑलिम्पिक मेडल जिंकल्यासारखं वाटतंय”, अशी प्रतिक्रिया ममताने दिली होती. “महामंडलेश्वर बनण्याआधी मला अनेक प्रश्नांना सामोरं जावं लागलं होतं. चार अध्यात्मिक गुरुंकडून मला असंख्य प्रश्न विचारण्यात आले होते. आयुष्य आणि अध्यात्म यांच्याप्रती मी किती समर्पित आहे, याची परीक्षा घेतली गेली. अखेर जेव्हा माझ्या उत्तरांनी ते प्रभावित झाले, तेव्हा मला महामंडलेश्वर बनण्याची संधी मिळाली,” असंही ममताने सांगितलं होतं.












