ताम्हिणी घाटात एका खासगी बसला भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. ही बस लग्नाचे वऱ्हाडी घेऊन जात होती. दरम्यान ताम्हिणी घाटातील एका धबधब्याजवळ बसला भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर ४० प्रवाशी जखमी झाले आहेत.यातील १२ ते १३ प्रवाशांची प्रकृती गंभीर आहे. या घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी रवाना झालं. मृतांना बाहेर काढण्यात आलं असून जखमींवर उपचार सुरू आहेत.






मिळालेल्या माहितीनुसार, ही बस लग्नासाठी महाडहून चाकणला जात होती. यावेळी ४० ते ४५ वऱ्हाडी प्रवास करत होते. शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता ही बस ताम्हिणी घाटातून जात असताना, एका धबधब्याजवळ चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं. काही कळायच्या आत बस ताम्हिणी घाटात मार्गालगत उलटली. या अपघातात ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ४० प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लग्नाला जाणाऱ्या बसला अशाप्रकारे अपघात झाल्याने हळहळ व्यक्त केली जातेय. या अपघातामुळे पाहुण्यांना बराच वेळ रस्त्याच्या बाजुला बसून राहावं लागलं. या घटनेची दखल माणगाव पोलिसांनी घेतली असून घटनेचा तपास केला जात आहे. हा अपघात नेमका कशामुळे झाला, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आली नाही. अपघाताच्या कारणाचा शोध घेतला जातोय.













