विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार की नसणार? अध्यक्ष होताच राहुल नार्वेकरांची पहिली प्रतिक्रिया

0

विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मोठा धक्का बसला होता. मात्र या पराभवातून सावरत विधानसभेला महायुतीनं जोरदार पुनरागमन केलं. विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार तब्बल 231 जागांवर विजयी झाले. सर्वाधिक जागा जिंकत भाजप हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपचे 132 उमेदवार निवडून आले. तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाच्या 57 तर राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 41 जागा आल्या. दुसरीकडे मात्र महाविकास आघाडीला विधानसभेत अपेक्षेनुसार कामगिरी करता आली नाही. तीनही पक्ष मिळून केवळ 50 आमदारच आले. त्यामध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या 20 , काँग्रेसच्या 16 तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या 10 आमदारांचा समावेश आहे.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

विरोधी पक्ष नेत्यासाठी कोणत्याही एका पक्षाकडे विधानसभेत आमदारांची जेवढी संख्या आहे, त्याच्या तुलनेत दहा टक्के आमदार असावे लागातात. म्हणजे महाराष्ट्रात ती संख्या 29 होते. मात्र महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील एकाही पक्षाकडे तेवढं आमदारांचं संख्याबळ नाही, त्यामुळे यावेळी विधानसभेत विरोधी पक्षनेता असणार की नाही असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

नव्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर विशेष अधिवेशन बोलावण्यात आलं होतं. अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे आज विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. राहुल नार्वेकर यांची विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. अध्यक्ष होताच त्यांनी आता विधानसभा अध्यक्षपदावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. नियमात जे असेल त्यानुसार संधी दिली जाईल, कोणावरही अन्याय होणार नाही, जनतेच्या कोर्टात मी गेलो, मला 50 हजारांचं लीड मिळालं, ज्यामुळे जे टीका करतता त्यांच्याकडे मी लक्ष देणार नाही, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, आज माझी बिनविरोध निवड झालेली आहे, राज्यातील 13 कोटी जनतेचे नेतृत्व करणाऱ्या लोक प्रतिनिधींना मी बोलण्याची संधी देईन. जरी विरोधकांची संख्या कमी असली तरी त्याना बोलण्याची संधी मी देईन. कामकाज सल्लागार समितीत त्यांची संख्या बसत नसताना देखील मी त्यांना समितीत सामावून घेतले. सर्व बैठका योग्य रित्या होतील. मागील अडीच वर्षांचा तपशील बघा आम्ही रेकॉर्ड ब्रेक काम केले आहे, असं नार्वेकर यांनी म्हटलं आहे.