एकनाथ शिंदे गावी का गेले? बोलण्याच्या ओघात गोगावलेंनी सगळं सांगितले त्यांची अशी तयारी पण आमचा हा आग्रह!

0

सत्ता स्थापनेचा तिढा सुरू असताना दुसरीकडे राज्याचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अचानक सातारा जिल्ह्यातील आपल्या मूळगावी गेले होते. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. अखेर रविवारी एकनाथ शिंदे यांनी मूळ गाव दरेगावाहून ठाण्याला प्रस्थान केले. महायुतीमध्ये आलबेलं असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे हे अचानक गावी गेल्याने त्यांच्या नाराजीची चर्चा सुरू झाली होती. मात्र, शिंदे हे गावी का गेले हे, शिवसेना शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले यांनी बोलण्याच्या ओघात सांगितले.

भरत गोगावले यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांची उत्तरे दिली. त्यांनी म्हटले की, राजकारणात काही समीकरणे असतात, ही समीकरण जमवावी लागतात. त्यासाठीची वरिष्ठांमध्ये चर्चा सुरू असल्याचे त्यांनी म्हटले. आम्हाला अधिकाधिक खाती मिळावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कोणताही पक्ष आपल्यासाठी अधिक खाती मिळवण्यासाठी प्रयत्न करत असतात, असेही भरत गोगावले यांनी म्हटले. एकनाथ शिंदे हे नाराज वगैरे या सगळ्या चर्चा आहेत. तिन्ही पक्षात कोणतीही कटुता नाही. महायुतीचे सरकार स्थापन होईल आणि चांगली कामगिरी सरकार करेल असेही त्यांनी म्हटले.

अधिक वाचा  स्थानिक निवडणुका निवडणूक आयोग सजग; आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध सुनिश्चित करा, पुरेसा बंदोबस्त ठेवावा

एकनाथ शिंदे गावी का गेले?

भरत गोगावले यांनी म्हटले की, राज्यातील सत्ता स्थापनेबाबत आमची काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. त्यावेळी त्यांनी सत्तेच्या बाहेर राहून काम करण्याची तयारी त्यांनी दर्शवली होती. पण, आम्ही त्यांना सत्तेत राहून काम करण्याची विनंती केली. त्यावर त्यांनी मला दोन दिवस गावी जाऊन येऊ द्यात. गावी गेल्यावर मी जरा शांतपणे विचार करेल, असेही त्यांनी सांगितले.

शिंदेंचा दरेगावचा दौरा पूर्वनियोजित?

भरत गोगावले यांच्या या वक्तव्याने एकनाथ शिंदे यांचा हा दौरा पूर्वनियोजित होता का, अशी चर्चा सुरू झाली आहे. मागील आठवड्यात दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत महायुतीची बैठक झाली. रात्री उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत खाते वाटप आणि इतर गोष्टींवर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले होते. दिल्लीतील या बैठकीनंतर काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुंबईत दाखल झाले. त्यानंतर त्यांनी सत्ता स्थापनेच्या मुद्यावर ठाण्यात पत्रकार परिषद घेतली आणि त्यानंतर ते साताऱ्याला रवाना झाले.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती