भाजप पक्षश्रेष्ठी विश्वास रणनीतीमध्ये अजित पवारांची सरशी; खातेवाटपात अजित पवारांचा वरचष्मा राहणार

0

राज्याच्या विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर घडत असलेल्या घडामोडीनंतर भाजपच्या पक्षश्रेष्ठींचा विश्वास संपादन करण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी सरशी घेतली असून शिवसेनेच्या काही नेत्यांच्या अतिउत्साहीपणामुळे या पक्षाच्या विश्वासात घट झाल्याची चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात आहे. निवडणुकीत महायुतीला भरघोस यश मिळाल्यानंतर पाच दिवस उलटून गेल्यानंतरही सरकार स्थापन झालेले नाही. भाजपचे प्रमुख सहकारी पक्ष असलेल्या शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसलाही चांगले यश मिळाले. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदे यांना कायम ठेवावे, अशी आग्रही मागणी शिवसेनेच्या काही नेत्यांनी केल्यानंतर भाजपच्या वर्तुळात काहीशी नाराजी पसरली.

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!

मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असाही प्रस्ताव समोर केल्याने शिवसेनेबद्दल असलेल्या विश्वासाला दिल्लीत तडे गेल्याचे बोलले जात आहे. मुख्यमंत्रिपदावरून खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी एक ट्विट केले होते. ते ट्विट काही वेळाने काढूनही टाकण्यात आले.

अजित पवारांचा वरचष्मा राहणार

जून २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले. यानंतर शिंदे यांच्याकडे भाजपचे विश्वासू सहकारी म्हणून पाहिले गेले. भाजपच्या नेते व कार्यकर्त्यांनाही विचारधारेनुसार अजित पवार यांच्याऐवजी शिंदेच जवळचे वाटत होते. परंतु निकालानंतरच्या घडामोडीनंतर या विश्वासाला काहीसा तडा गेल्याचे चित्र आहे. यामुळे नवे सरकार आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा राहण्याचा, तसेच उपमुख्यमंत्रिपदामध्ये क्रमांक एकचे उपमुख्यमंत्रिपदही अजित पवार यांना मिळणार असल्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  श्रमिक राष्ट्रीय कामगार सेना महाराष्ट्र प्रदेश सहसचिवपदी मनोज खैरे नियुक्त

अमित शहांची भेट

या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल व प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेऊन सरकार स्थापनेच्या संदर्भात चर्चा केली. काही महत्त्वाची खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे द्यावी, अशी मागणी करण्यात आल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी भेट घेतल्यानंतर शिवसेनेच्या नेत्यांनी तत्काळ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय राज्यमंत्री प्रताप जाधव, खासदार संदीपान भुमरे यांनी अमित शहा यांची सदिच्छा भेट घेतली.