विधानसभा निवडणुकांची घोषणा होताच दोन मोठे नेते जरांगे पाटलांच्या भेटीला, अंतरवालीत मध्यरात्री घडामोडींना वेग

0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे बिगुल अखेर वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने मंगळवारी पत्रकार परिषद घेत राज्यातील निवडणुकांची घोषणा केली. येत्या २० नोव्हेंबर २०२४ ला महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक पार पडणार आहे. तर त्यानंतर लगेचच तीन दिवसांनी २३ नोव्हेंबर रोजी विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होतील. आगामी विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजताच राज्यातील सर्वच पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. लोकसभा निवडणुकीत अनेकांना मराठा मतांचा फटका बसला होता. त्यामुळे सावधगिरीचा पर्याय म्हणूनसर्वच पक्षातील आमदार आणि नेते मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये म्हणून भेटीगाठी सुरु
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे घनसावंगीचे आमदार राजेश टोपे यांनी मनोज जरांगे पाटील यांची मध्यरात्री भेट घेतली आहे. रात्री पावणे तीन वाजता राजेश टोपे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात बैठक झाली. अंतरवाली सराटीत ही बैठक पार पडली. यावेळी राजेश टोपे आणि मनोज जरांगे यांच्यात कोणत्या विषयावर चर्चा झाली, याची अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. मात्र लोकसभा निवडणुकीत जरांगे पॅटर्न हा चांगलाच चालला होता. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत कोणताही फटका बसू नये, यासाठी अनेक नेते हे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेत आहेत.

अधिक वाचा  माजी कृषीमंत्र्याच्या ‘पुत्रा’ची ‘वारसहक्क’ टिकवण्यासाठी भाजपमध्ये कोलांटउडी भाजपाचही टेन्शन गेलं; शहरभर निष्ठावंतांची नाराजी अन् बंड नवे संकट

शक्यतो रात्रीच्या वेळी अनेक नेते अंतरवाली सराटीत
राजेश टोपे यांच्या आधी रात्रीच्या अंधारात राधाकृष्ण विखे पाटील यांनीही मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेते मंडळी भेट घेत आहेत. काल रात्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या आठ दिवसात राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांची दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. सध्या मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्यासाठी शक्यतो रात्रीची वेळ निवडत आहे. राधाकृष्ण विखे पाटील यांनीही जरांगेंना भेटण्यासाठी रात्री पावणे दोन वाजताची वेळ घेतली होती.

अधिक वाचा  भाजपच्या पुणे ‘सर्जिकल स्ट्राईक’ नंतर कोअर कमिटीत 100 नावांवर एकमत ; आधी आपला बाब्या अन् नंतर….?

विधानसभा निवडणुकांचे संपूर्ण वेळापत्रक
22 ऑक्टोबरला अधिसूचना निघेल
23 ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज भरता येईल
29 ऑक्टोबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे
30 ऑक्टोबरला अर्जाची छाननी होईल
4 नोव्हेंबर अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे
20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होईल