लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही फोडली नाही तर त्यांच्या पूत्रमोह आणि मुलीवरील प्रेमामुळे फुटली अशी टीका अमित शाह यांनी केली होती. आता या टीकेला उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.






उद्धव ठाकरे यांची टीका
पूत्रप्रेमाच्या टीकेला उत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी अमित शाह यांना टोला लगावला. एकदिवसीय वर्ल्ड कपमध्ये अमित शाहंच्या पूत्रप्रेमामुळे भारत हरला अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली. तुमची लाज तुमचे चेलेचापाटे काढत आहेत. देवेंद्र फडणवीस बोलतात की मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलोय आणि तुम्ही दुसरेच काही सांगताय, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केलीय. अमित शाह महाराष्ट्रात आले, आमच्यावर टीका करण्यापेक्षा ते शेतकऱ्यांच्या बांधावर गेले असते तर बरं झालं असतं, अवकाळी पावसामुळे नुकसान झाल्यानंतर आमची स्थानिक लोक तिथे जातात असा टोलाही त्यांनी लगावला.
काय म्हणाले होते अमित शाह?
महाराष्ट्रातील भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ भंडाऱ्यात जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेत बोलताना अमित शाह यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर टीका केली. उद्धव ठाकरे आणि शरद पवार म्हणतायत भाजपने आमचे पक्ष फोडले. पण उद्धव ठाकरे यांच्या पुत्रमोहामुळे शिवसेना फुटली तर शरद पवारांच्या मुलीवरील प्रेमामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तुटली अशी टीका अमित शाह यांनी केली होती.
राज्यात गुंडागर्दी
अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावरुन उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवरही टीका केली. राज्यात खुलेआम गुंडागर्दी सुरू आहे .या सरकारला सरकार चालवण्याचा कुठलाही अधिकार नाही.
घटनाबाह्य सरकार हे राज्य चालवत आहे . कोणी कुठे गोळीबार करतं त्यांना थांबवण्याची यांच्यात हिम्मत नाही. यांचं लक्ष राज्यावर नाहीये तरी त्यांना फक्त मतं हवी आहेत, असा हल्लाबोलही त्यांनी केला.
मविआचे उमेदवार
राज्यात महाविका आघाडीच्या उमेदवारांबद्दल बोलताना उद्धव ठाकरे यांनी आपण राज्यासाठी काही वेगळा वचननामा द्यायचा का त्या संदर्भात आपण विचार करतो आहोत, काही वेगळे मुद्दे यामध्ये घ्यायचे का एक-दोन दिवसात चित्र स्पष्ट होईल असं सांगितलं. तसंच काही उमेदवार काँग्रेसकडून जाहीर होणे बाकी आहे, एक-दोन दिवसात ते होतील अशी माहितीही दिली.
नवी मुंबईत दुहेरी मालमत्ता कर आकारणी केली जात असल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केलाय. सिडको डबल कर आकारणी करतेय… ही दुहेरी कर आकारणी जुलूमशाही असल्याचा घणाघात उद्धव ठाकरे यांनी केलाय. भाजपच्या पनवेलमधील माजी नगरसेविका निना घरत यांचा ठाकरे पक्षात प्रवेश केला. तसंच यावेळी मनसेचेही पदाधिकारी ठाकरे पक्षात प्रवेश केला. यावेळी त्यांनी डबल कर आकारणीवरून निशाणा साधला.











