कोलकत्ता उच्च न्यायालयाने माजी न्यायाधीश अभिजीत गंगोपाध्याय भाजपाच्या तिकीटीवर लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. महात्मा गांधी आणि नथुराम गोडसे यांच्यावरुन अभिजीत गंगोपाध्याय यांनी एक टिप्पणी केली. त्यावरुन काँग्रेसने त्यांना टार्गेट केलय. काँग्रेस सरचिटणीस जयराम रमेश यांनी या संदर्भात X वर एक पोस्ट लिहीली आहे. “अभिजीत गंगोपाध्याय यांनी भाजपाच्या तिकीटावर लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी कोलकात्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आशिर्वादाने त्यांनी हे पाऊल उचलल. गांधी आणि गोडसेमध्ये मी कोणी एकाची निवड करु शकत नाही, हे त्यांच म्हणण म्हणजे केविणावाणी म्हणण्यापेक्षा वाईट अवस्था झाली. त्यांचे हे वक्तव्य अजिबात मान्य नाही. महात्मा गांधींच्या वारशावर दावा सांगणाऱ्यांनी लगेच त्यांची उमेदवारी काढून घ्यावी” असं जयराम रमेश यांनी लिहील आहे.






कोलकत्ता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदाचा राजीनामा दिल्यानंतर काही दिवसात अभिजीत गंगोपाध्याय यांना भाजपाने आपल उमेदवार बनवलं. अलीकडेच एका बंगाली चॅनलशी बोलताना ते म्हणाले की, मी गांधी आणि गोडसे यांच्यात निवड करु शकत नाही. या टीव्ही कार्यक्रमात इंटरव्यू दरम्यान रॅपिड फायर राऊंडमध्ये त्यांना अनेक प्रश्न विचारण्यात आले. अभिजीत गंगोपाध्याय यांना गांधी आणि गोडसे दोघांपैकी एकाची निवड करण्यास सांगण्यात आलं. या प्रश्नावर त्यांनी दीर्घ श्वास घेतला व म्हणाले की, मी या प्रश्नाच आता उत्तर देऊ शकत नाही. मला यावर विचार करण्याची आवश्यकता आहे. कायद्याच्या पेशाशी संबंधित असल्याने मला दुसरी बाजू सुद्धा समजून घेतली पाहिजे. मला नथूराम गोडसे याच लेखन वाचलं पाहिजे. त्याने महात्मा गांधींच्या हत्येच पाऊल का उचलल? हे समजून घेतलं पाहिजे.
त्याआधी दिला पदाचा राजीनामा
हायकोर्टात वकिली करताना अभिजीत गंगोपाध्याय 2 मे 2018 रोजी कोलकाता उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश बनले. उच्च न्यायालयाच्या वेबसाइटनुसार, 30 जुलै 2020 रोजी त्यांना पदोन्नती देऊन स्थायी न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली. यावर्षी ऑगस्ट महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. त्याआधी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. अभिजीत गंगोपाध्याय भाजपामध्ये सहभागी झाल्यानंतर म्हणाले की, “आज मी एका नव्या क्षेत्रात पाऊल टाकतोय. मी भाजपामध्ये सहभागी होऊन आनंदी आहे. राज्यातून भ्रष्ट टीएमसीला बाहेर करण आमचा उद्देश आहे”











