महाराष्ट्राच्या राजकारणात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी शिवसेनेचे मंत्री, नेते, खासदार आणि आमदारांची बैठक होत आहे. या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष संघटना, राज्यातील गाव, वाडी वस्ती पातळीवर मजबूत करण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत. तसंच शिवसेना पक्ष कार्यकारिणीने राज्यातील जिल्हा निहाय संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांना एक शिवसेना मंत्री जोडून जनतेच्या विकासांची कामं वेगाने पूर्ण करण्यासाठी सहकार्य करत आहेत. येणाऱ्या सर्व निवडणुकांसाठी शिवसेना संघटना बळकट करण्यासाठी आतापासूनच शिवसेनेने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.






शिवसेनेने ही बैठक बोलावली असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या फुटीनंतर दोन्ही गटांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं आहे. अजित पवार आणि शरद पवार यांनी मुंबईमध्ये मेळाव्यांचं आयोजन केलं होतं. या दोन्ही मेळाव्यांमध्ये अजित पवार यांच्याकडे जास्त आमदार असल्याचं पाहायला मिळालं. तसंच आपल्याला 40 पेक्षा जास्त आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवारांनी केला आहे. एवढच नाही तर अजित पवारांच्या गटाने निवडणूक आयोगातही धाव घेतली आहे. तसंच राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ हे चिन्ह असल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे. एवढच नाही तर अजित पवार यांनी पक्षाचे अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आल्याचं अजित पवार गटाकडून निवडणूक आयोगाला सांगण्यात आलं आहे.













