नवी दिल्ली : भारतातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंहविरोधात केलेले आंदोलन अद्याप कायम आहे. कुस्तीपटूंनी मंगळवारी आपण मिळवलेली पदके गंगा नदीत सोडण्याचेही पाऊल उचलले. लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेल्या ब्रिजभूषण यांना तुरुंगात टाकण्याची मागणी कुस्तीपटू करीत आहेत. पण केंद्रीय यंत्रणेकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसल्यामुळे कुस्तीपटू मागे हटण्यास तयार नाहीत. या प्रकरणाचा फटका भारतीय कुस्ती संघटनेला बसण्याची दाट शक्यता आहे.






जागतिक कुस्ती संघटना ब्रिजभूषण यांच्याविरोधात होत असलेल्या चौकशीवरून नाराज आहे. तसेच त्यांच्याकडून भारतीय कुस्ती संघटनेला तंबी देण्यात आली आहे. आगामी ४५ दिवसांत नव्याने निवडणुका घेतल्या नाही, तर निलंबनाच्या शिक्षेला त्यांना सामोरे जावे लागणार आहे. भारतीय कुस्तीपटू अनेक दिवसांपासून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. भारतातील केंद्रीय यंत्रणेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कुस्तीपटूंना जी वागणूक दिली जात आहे, तीही अयोग्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्येही पारदर्शकता दिसून येत नाही, अशी टीका जागतिक कुस्ती संघटनेकडून याप्रसंगी करण्यात आली आहे.
त्रयस्थ झेंड्याखाली खेळावे लागेल
लवकरात लवकर निवडणूक घेतली नाही, तर निलंबनाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना त्रयस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावे लागेल.












