पुण्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसची घट

0
1

गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी (ता. १) हजेरी लावली. परिणामी कमाल तापमानात किंचित घट झाली. पुढील तीन ते चार दिवस कमाल तापमानात घट होणार असून, पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. पुणे आणि परिसरात मंगळवारी सकाळी ढगाळ वातावरण होते, तर सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरात हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली. त्यामुळे वातावरणात काही काळ गारवा निर्माण झाला. मात्र, या पावसामुळे नागरिकांची विशेषतः दुचाकीस्वारांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रमुख रस्त्यांवर वाहतूक संथ झाली होती. शहरात कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने घट होऊन कमाल तापमान २८ अंश सेल्सिअस इतके, तर २२.४ इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात मुसळधार पाऊस सुरू आहे, तर पुढील दोन दिवसांत पावसाचा जोर अधिक वाढणार असून तुरळक ठिकाणी खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याच्या घाट विभागात ‘ऑरेंज’ अलर्ट देण्यात आला आहे, तर शहर आणि परिसरात पुढील दोन ते तीन दिवसांत कमाल तापमानात किंचित घट होणार असून, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.

सध्या मॉन्सून ‘सक्रिय’ असून पुढील काही दिवसांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. गंगेचा पश्चिम बंगाल व उत्तर ओडिशालगतच्या परिसरावर असलेला कमी दाबाचा पट्टा आता झारखंड आणि शेजारील भागांवर स्थिरावलेला आहे. त्यासोबत असलेली चक्राकार वाऱ्यांची स्थिती समुद्रसपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीपर्यंत आहे.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

असा आहे पावसाचा अंदाज

पुणे आणि परिसरात बुधवारी (ता. २) कमाल तापमानात किंचित घट होणार असून कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस इतके तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस नोंदविण्यात येणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहणार असून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. गुरुवारपासून (ता. ३) पुढील तीन दिवस कमाल तापमानात आणखी घट होण्याची शक्यता असून, कमाल तापमान २६ अंश सेल्सिअसपर्यंत नोंदविणार आहे. आकाश अंशतः ढगाळ राहून हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे.