चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद असलेल्या पाकिस्तानचा संघ स्पर्धेच्या अवघ्या दिवसांतच स्पर्धेतून बाहेर झाला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीतील सहावा सामना न्यूझीलंडविरूद्ध बांगलादेश यांच्यात खेळवला गेला. न्यूझीलंड संघाने बांगलादेशचा ६ विकेट्सने पराभव केला. पण न्यूझीलंडच्या या विजयासह पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ मधून बाहेर झाला. तर चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अ गटातून भारत आणि न्यूझीलंड हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. भारत आणि न्यूझीलंडने सुरूवातीचे दोन्ही सामने जिंकत थेट सेमीफायनल गाठली आहे.
तब्बल ३० वर्षांनंतर पाकिस्तानला आयसीसी स्पर्धेचे यजमानपद भूषवण्याची संधी मिळाली होती. १९९६ मध्ये झालेल्या विश्वचषकाचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. त्यानंतर थेट आता २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद पाकिस्तानला मिळाले होते. पाकिस्तानने आयसीसी स्पर्धेचे यजमानपद मिळावे यासाठी बरेच प्रयत्न केले होते. पण घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यांचा पाकिस्तानने बिलकुल फायदा करून घेतला नाही आणि पहिल्या दोन सामन्यात पराभूत होत स्पर्धेतील आपले आव्हान संपुष्टात आणले.
इतकंच नव्हे तर पाकिस्तानचा संघ २०१७ मधील चॅम्पियन्स ट्रॉफीचा विजेता संघ होता, म्हणजेच या स्पर्धेतील गतविजेता संघ होता. पण पाकिस्तान आता गट सामन्यांतूनच बाहेर झाला आहे. पाकिस्तानला पहिल्या सामन्यात न्यूझीलंडकडून ६० धावांनी पराभवाला सामोरे जावे लागले. तर दुसऱ्या सामन्यात भारताकडून ६ विकेट्स आणि ४५ चेंडू राखून पराभव पत्करावा लागला होता. सलग दोन सामन्यांमधील पराभवाने आता पाकिस्तान आणि बांगलादेशचा संघ गट सामन्यांमधूनच स्पर्धेतून बाहेर झाला आहे.