….उत्तर महाराष्ट्रात मोठी गडबड? बीड रायगड व जळगाव पालकमंत्रीपद वाद की रस्सीखेच! पालकमंत्र्यांची नियुक्ती का नाही?

0

ज्यात महायुतीचे सरकार येऊन दीड महिना उलटला आहे. नवीन मंत्रिमंडळ स्थापनेलाही एक महिन्याचा कालावधी उलटला आहे. मात्र असं असताना देखील पालकमंत्री पदाचा सस्पेन्स अद्याप कायम आहे. महायुतीत सर्व काही सुरळीत सुरू असल्याचं सांगितलं जातं. असं असताना पालकमंत्री निवडीला ऐवढा वेळ का लागत आहे असा प्रश्न पडला आहे. वाद, रस्सीखेच आणि रुसवे फुगवे असल्यामुळेच पालकमंत्रिपदाच्या नियुक्त्या रखडल्या असल्याचं बोललं जात आहे. रायगड, बीड, जळगाव या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून पेच फसला असल्याची जोरदार चर्चा आहे.

राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी विधानसभा निवडणुकीत मात्र महायुतीला राज्यातील जनतेने भरघोस मतांनी निवडून दिल आहे. मात्र महायुतीचा विजय झाल्यानंतर मुख्यमंत्रिपदावरून सुरू असलेला तिढा सुटत नाही, तोच महायुतीतील घटक पक्षांकडे मंत्रीपदावरून तिढा निर्माण झाला होता. त्यामुळे मंत्रिमंडळाच्या स्थापनेला बराच वेळ गेला. मंत्रिमंडळ स्थापन झाल्यानंतर खातेवाटप ही लांबले होते. मात्र उशिरा का होईना खाते वाटप ही झाले. पण खातेवाटप होऊनही पालकमंत्री पदाचा तिढा मात्र अद्याप काही सुटलेला नाही. त्यातच जळगाव जिल्ह्यात भाजप व शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदावरून जोरदार रस्सीखेच सुरु असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार

पालकमंत्री पदावरून महायुतीतील तीनही नेत्यांकडून दररोज चर्चा सुरू असताना अद्यापही पालकमंत्री निवडीवर कुठलाही तोडगा निघालेला नाही. भाजप नेते गिरीश महाजन यांचा जळगाव जिल्हापेक्षा नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रिपदासाठी आग्रह असल्याची माहिती आहे. मागील काळात देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना गिरीश महाजन यांच्याकडे नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्रिपद होते. तसेच नाशिकमध्ये झालेल्या कुंभमेळ्या करिता त्यांच्यावर विशेष जबाबदारी देण्यात आली होती.

योगायोगाने मुख्यमंत्रिपदी पुन्हा देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले आहे. 2027 मध्ये नाशिक इथं कुंभमेळा होणार आहे. त्यामुळे गिरीश महाजन हे पुन्हा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदासाठी आग्रही असल्याची चर्चा आहे. त्यामुळे गुलाबराव पाटील व संजय सावकारे यांच्यातच जळगाव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून रस्सीखेच सुरू आहे. संजय सावकारे हे मात्र या पदासाठी फिल्डींग लावून आहेत.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

गेल्या महायुतीच्या काळात गुलाबराव पाटील हे जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री होते. जळगाव जिल्ह्यात दोन भाजपचे कॅबिनेट मंत्री असल्याने पालकमंत्री पद भाजपाला मिळावं यासाठी भाजप आग्रही असल्याचे बोलले जात आहे. पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता शिवसेनेकडूनही अप्रत्यक्ष पालकमंत्री पदावर दावा केला जात आहे. पालकमंत्री पदाच्या वाटपा आधीच गुलाबराव पाटलांनी एका कार्यक्रमा दरम्यान अप्रत्यक्ष पालकमंत्री पदासाठी दावा ही केला आहे. पालकमंत्री पदाचा तिढा सुटत नसल्यामुळे विरोधकांकडूनही या सरकारला घेरण्याचा प्रयत्न सुरू आहे. मोठ्या प्रमाणात बहुमत असूनही महायुतीतील तीनही पक्षांमध्ये सारं काही अलबेल दिसत असलं तरी प्रत्यक्षात मात्र तिघांमध्येही अविश्वास असल्याचे विधान परिषदेचे आमदार व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी म्हणलं आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

राज्यातील 36 जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने बीड रायगड व जळगाव जिल्ह्यातील पालकमंत्री पदाचा तिढा सुटलेला नाही. राज्यातील पालकमंत्री पदाची निवड ही प्रलंबित असल्याचे बोलले जात आहे . एकीकडे पालकमंत्री पदाचा तिढा तर दुसरीकडे बीडमध्ये सुरू असलेला तणाव असं दुहेरी आवाहन महायुतीच्या सरकार समोर निर्माण झालं आहे. त्यामुळे आता हा तिढा कसा सुटणार व पालकमंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.