चौथ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी यशस्वी जैस्वलाने तीन कॅच सोडल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापला होता. दरम्यान यावरुन ऑस्ट्रेलियाच्या प्रसारमाध्यमांनी रोहित शर्माची खिल्ली उडवली आहे. याआधी पर्थमधील ‘द वेस्ट ऑस्ट्रेलियन’ वृत्तपत्राने विराट कोहलीला सॅम कोन्टाससह झालेल्या वादानंतर त्याचा ‘जोकर’ उल्लेख करत तशा रुपातला फोटो छापला होता. आता याच वृत्तपत्राने यशस्वी जैस्वालने कॅच सोडल्याने चिडलेल्या रोहित शर्माला टार्गेट केलं आहे. या बातमीला त्यांनी ‘Captain Cry Baby’ अशी हेडलाईन दिली आहे. सोबतच रोहितचा एडिट केलेला रडतानाचा फोटो लावला आहे. भारतीय संघात कोहली एकमेव लहान मूल नाही हे दिसून आलं असंही त्यांनी लिहिलं आहे.
यशस्वी जैस्वालने चौथ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी दुपारच्या सत्रात अनेक झेल सोडले ज्यामुळे कर्णधार रोहित शर्मा चांगलाच संतापलेला पाहायला मिळाला होता.
बुमराहने उस्मान ख्वाजाला टाकलेल्या चेंडूवर पहिला झेल सुटला. ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावातील तिसऱ्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर पहिली घटना घडली. यशस्वी हातात आला चेंडू पकडण्यात अयशस्वी ठरला. जवळ उभा असल्याने त्याच्याकडे व्यक्त होण्यासाठी फार कमी वेळ असला तरी हे कारण न चालणारं होतं. 40 व्या षटकात मार्नस लॅबुशेनचा झेलही त्याने सोडला. यावेळी आकाशदीप गोलंदाजी करत होता. त्यावेळी लॅबुशेनचं अर्धशतकही झालं नव्हतं. या झेलसह सामना पूर्णपणे फिरण्याची शक्यता होती. आपण किती मोठी चूक केली आहे हे लक्षात आल्यानंतर यशस्वी जीभ चावत होता. तर दुसरीकड रोहित शर्मा रागात आपलं हात झटकत असल्याचं समालोचकांनी निदर्शनास आणून दिलं.
जैस्वालची चूक असतानाही समालोचक माईक हसीने मात्र रोहितच्या देहबोलीवर टीका केली. त्याने संयम राखणं महत्त्वाचं असून, तरुण खेळाडूंनी असे झेल सोडल्यानंतर संताप व्यक्त करण्याऐवजी शांत राहावं असं तो म्हणाला.
“प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर, ही कर्णधाराकडून योग्य देहबोली नाही,” असं माईक हसीने फॉक्स क्रिकेटवर सांगितलं. “तो भावनिक आहे आणि त्याला विकेट्स हव्या आहेत याचं कौतुक आहे. पण तूच संघाला संयम आणि पाठीशी असल्याचा संदेश पाठवणं गरजेचं आहे. कोणाचीही झेल सोडण्याची इच्छा नसते. आपण झेल सोडल्याचं आणि खासकरुन लॅबुशेचनचा ड्रॉप केल्याचं त्यालाही वाईट वाटत असणार. ते फार जलद झालं,” असं माईक हसी म्हणाला.
ऑस्ट्रेलियाच्या ॲलिसा हिली म्हणाली, “तुम्ही जेव्हा त्याच्यासह मैदानात फलंदाजीसाठी उतराल तेव्हा काही धावा करण्याची आणि तुमच्या देशासाठी कसोटी सामना जिंकण्याच्या प्रयत्नांची अपेक्षा असेल”.
जैस्वाल सिली पॉईंटवर असताना 49व्या षटकात झेल सोडण्याची तिसरी घटना घडली. रवींद्र जाडेजाच्या चेंडूवर पॅट कमिन्स फसला आणि चेंडू जैस्वालच्या हातात गेला. पण पुन्हा एकदा त्याच्याकडून झेल सुटला. यावेली रोहित शर्मा पुन्हा एकदा चिडलेला दिसला.