मुंबईतील बोट दुर्घटनाग्रस्तांसाठी आरीफ बामणे ठरले ‘देवदूत’, उद्धव ठाकरेंकडून मातोश्रीवर सन्मान

0

गेट वे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणाऱ्या नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. त्यात दोन्ही बोटींना जलसमाधी मिळाली. या दुर्घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला तर 100 जणांना वाचवण्यात यश आले आहे. या अपघातात स्वतःचा जीव धोक्यात घालून 35 प्रवाशांचे प्राण वाचवणारे ‘देवदूत’ आरीफ बामणे यांचा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सन्मान करण्यात आला.

उद्धव ठाकरे यांनी आरीफ बामणे यांना मातोश्रीवर बोलावून घेत त्यांचा सन्मान केलाय. आरिफ बामणे यांनी दाखवलेले प्रसंगावधान, धाडस आणि शौर्याचे उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. यावेळी खासदार अरविंद सावंत, शिवसेना ठाकरे गटाचे सचिव आणि आमदार मिलिंद नार्वेकर, आमदार मनोज जामसुतकर उपस्थित होते.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

35 प्रवाशांचे वाचवले प्राण

दरम्यान, आरीफ हे पूर्वा बोटीवर बोटमास्टर असून ही दुर्घटना घडली तेव्हा तिथून काही अंतरावर त्यांची बोट होती. आरीफ यांनी क्षणाचाही विलंब न करता समुद्रात उडी घेतली आणि किमान 35 प्रवाशांचे प्राण त्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी वाचवले. पायलट बोटीचा आधार घेत त्यांनी 35 प्रवाशांना वासुदेव फेरीबोटीत सुरक्षितरीत्या नेले. तसेच एका साडेतीन वर्षीय चिमुकलीला देखील आरिफ यांनी जीवनदान दिले. बोटमास्टर आरिफ आणि त्यांचे सहकारी कर्मचारी किफायत मुल्ला, तपस कार, नंदू जाना यांना शिवसेनेच्या वतीने रोख स्वरूपात बक्षीस देऊनही सन्मानित करण्यात आले.

अधिक वाचा  अजित पवार गटातही नाराजीनाट्य; पुण्यातील बडा नेता राजीनामा देणार? 

नेमकं काय घडलं होतं?

मुंबईवरून एलिफंटाकडे नीलकमल बोट जात होती. नीलकमल बोटीला नौदलाच्या स्पीडबोटीने धडक दिल्याने भीषण अपघात झाला होता. नीलकमल बोटीतून 100 हून अधिक प्रवासी प्रवास करत होते. ही दुर्घटना घडल्यानंतर लगेचच तातडीने मदतकार्य करण्यात आले. यावेळी नौदलाने या बोटीमधील 101 प्रवाशांना सुरक्षित वाचवलं. तर या घटनेत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून दिली जाईल. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.