महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? याचा सस्पेन्स आज (२ डिसेंबर २०२४) संपणार आहे. सोमवारी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार, हे निश्चित होईल, त्या निवडीला आमच्या पक्षाचा बिनशर्त पाठिंबा असेल, असे शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांनी रविवारी सांगितले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांचं नाव भाजपने फायनल केल्याचं समोर आलेय. आज यावर अधिकृत शिक्कामोर्तब होणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाले आहे. भाजप आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार आहे. मंगळवारी भाजप आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे. या बैठकीतच देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ पक्ष नेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे. त्यामुळे भाजपकडून मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचेच नाव निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित झाल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्यांनी रविवारी सांगितले. भाजपच्या विधिमंडळ पक्षनेत्यांच्या निवडीसाठी दोन अथवा तीन डिसेंबर रोजी आमदारांची बैठक होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा जो निर्णय घेतील, तो आम्हाला मान्य असेल. त्या नावाला आमचा बिनशर्त पाठिंबा असेल, असे एकनाथ शिंदे यांनी रविवारी स्पष्ट केलेय.
एकनाथ शिंदे काय म्हणाले ?
महायुतीसोबत होणाऱ्या बैठकीत गृहमंत्रालयासोबत अन्य मुद्द्यांवर अंतिम निर्णय होईल. महाराष्ट्रातील लोकांनी महायुतीला स्पष्ट बहुमत दिलेय. लोकांच्या अपेक्षा पूर्ण करणं, आमचं प्रमुख काम आहे, असे एकनाथ शिंदे यांनी सांगितले. रविवारी एकनाथ शिंदे साताऱ्यातील गरे गावातून ठाण्यात आले. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
श्रीकांत शिंदे उपमुख्यमंत्री होणार? शिवसेनेला गृहमंत्रालय मिळणार का? याबाबत बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, ‘महायुतीमधील तिन्ही घटकपक्ष भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांच्या सहमतीनेच अंतिम निर्णय घेतला जाईल. ‘ दरम्यान, महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतरही आठवडा झाला तरी मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स कायम आहे. दोन दिवसांमध्ये यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे. ५ डिसेंबर रोजी नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
मुख्यमंत्री भाजपचाच –
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी शनिवारी मुख्यमंत्री भाजपचाच होईल, हे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री भाजपचाच असेल. उपमुख्यमंत्री शिवसेना आणि राष्ट्रवादीचा असेल. मागील दोन वर्षांप्रमाणेच सरकार चालेल, असे अजित पवार म्हणाले होते.
दादा-शिंदे यांच्यात वादाची ठिणगी?
गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीमध्ये सर्व काही ठीक नसल्याचं बोलले जातेय. अजित पवार महायुतीचा भाग नसते तर शिवसेनेचे उमेदवार १०० जागांवर निवडून आले असते, असे वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केल. आम्ही फक्त ८५ जागांवर निवडणुका लढवल्या. अजित पवार नसते तर आम्ही ९० ते १०० जागा जिंकल्या असते, असे गुलाबराव पाटील म्हणाले.