गावातील मतदान केंद्रावर मतदारांचा तो प्रश्न, अजित पवार पीएवरच संतापले, अरे दाखव ना ४३० कोटींच्या वर्क ऑर्डर…

0
1

पुणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी यंदा बारामतीची लढत अतिशय प्रतिष्ठेची झालेली आहे. अजित पवार यांनी सहा वेळा बारामतीचे प्रतिनिधित्व केले. परंतु चंद्रराव तावरे वगळता पाच वेळी त्यांच्यासमोर तगडा प्रतिस्पर्धी नसल्याने त्यांनी अगदी सहज विजय मिळवला. विधानसभा निवडणूक काळात तसेच प्रचारकाळात ते फारसे मतदारसंघात न थांबता महाराष्ट्रभरातील राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा प्रचार करण्यात व्यग्र असायचे. बारामतीत शेवटची विराट सभा घेऊन तिथेच त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होत असे. परंतु यंदा घरातूनच आव्हान उभे राहिल्याने अजित पवार यांच्यावर बारामतीत तळ ठोकून राहण्याची वेळ आली.

राष्ट्रवादीतील फुटीनंतर ४० आमदारांनी अजित पवार यांना साथ दिली. अपवाद वगळता त्यांनी सगळ्याच आमदारांना पुन्हा तिकीटे दिली. अजित पवार यांची राष्ट्रवादी ५५ ठिकाणी निवडणूक लढवते आहे. पक्ष लढत असलेल्या जवळपास बहुतांश मतदारसंघात जाऊन अजित पवार यांनी प्रचार केला. परंतु यादरम्यान बारामतीकडे दुर्लक्ष होणार नाही याची त्यांनी काळजी घेतली. पत्नी सुनेत्रा पवार आणि चिरंजीव पार्थ आणि जय पवार मतदारसंघात फिरत होतेच. अजित पवार यांनी अगदी वेळात वेळ काढून कधी नव्हे ते तालुक्यातील गाव दौरे केले. पुतण्याच समोर उभा ठाकल्यामुळे निवडणूक जड जायला नको, हे लक्षात घेऊन अजित पवार यांनी सगळी काळजी घेतली. आज सकाळपासून अजित पवार तालुक्यातील विविध गावांतील मतदान केंद्रावर जाऊन मतदानाची माहिती घेत आहेत. कार्यकर्ते तसेच पदाधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून सकाळपासूनच्या मतदानाची माहिती घेत आहेत.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

अजित पवार हे तालुक्यातील अंजनगावात दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास गेले होते. त्यावेळी मतदारांनी एका विकास कामासंदर्भात अजित पवार यांना प्रश्न विचारला.अजित पवार यांनी लगोलग त्यांच्या स्वीय सहाय्यकाकडे ४३० कोटींच्या वर्क ऑर्डरची मागणी केली. परंतु वर्क ऑर्डर आपल्याकडे नाही, असे त्यांने सांगताच अजित पवार यांचा पारा चढला. वर्क ऑर्डर सोबत का ठेवली नाही, अशी विचारणा त्यांनी स्वीय सहाय्यकाकडे केली. यावेळी उपस्थितांना अजित पवार यांचा रौद्रावतार पाहायला मिळाला.

गावातील रस्ते आणि पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी मतदारांनी केल्यानंतर त्यांना उत्तर म्हणून अजित पवार यांनी ४३० कोटींच्या वर्क ऑर्डरची मागणी केली. मात्र मतदारांना ठोस उत्तर देण्याकरिता ऑर्डर जवळ नसल्याने अजित पवार यांच्या संतापाचा पारा चढला.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप