अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतर जगभरातून डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्रम्प यांना शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदींनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना मित्र म्हटले आहे. त्यांनी लिहिले आहे की, माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांना ऐतिहासिक विजयाच्या हार्दिक शुभेच्छा. ज्यापध्दतीने तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा नेत आहात, त्यामध्ये मी भारत-अमेरिकेतील व्यापक जागतिक आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमचे सहकार्य पुन्हा नव्याने करण्यास उत्सुक आहे.
आपल्या लोकांच्या भल्यासाठी आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीसाठी एकत्रितपणे काम करूया, असेही मोदींनी म्हटले आहे. दरम्यान, ट्रम्प आणि मोदी यांच्यामध्ये राजकीय, धोरणात्मक, वैयक्तिक सबंधि सौहार्दपूर्ण राहिले आहेत. 2019 मध्ये अमेरिकेत हाऊडी मोदी आणि 2020 मध्ये अहमदाबातमध्ये नमस्ते ट्रम्प अशा मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन करत दोन्ही नेत्यांनी आपल्यातील मैत्रीचे जगाला दर्शन घडवले होते.
ट्रम्प यांच्या पहिल्या कार्यकाळात भारत आणि अमेरिकितील संबंध अधिक दृढ झाल्याचे मानले जाते. प्रामुख्याने चीन आणि पाकिस्तानच्या मुद्यावर ट्रम्प भारताच्या बाजूने उभे राहिले आहेत. दोन्ही देशांमध्ये दहशतवाद, संरक्षण आणि सुरक्षेच्या मुद्यावर एकत्रितपणे काम सुरू केले होते.
दरम्यान, ट्रम्प हे अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. त्यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला आहे. ही निवडणूक अत्यंत चुरशीची होईल, असे सुरूवातीपासून सांगितले होते. मात्र, ट्रम्प यांचाच या निवडणुकीत वरचष्मा राहिला. बहुतेक प्रमुख राज्यांतील मतदारांनी ट्रम्प यांच्या बाजूने कौल दिला आहे. त्यातुलनेत कमला हॅरिस प्रभाव पाडू शकल्या नाहीत.