काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या एका विधानावरुन मोठा वाद निर्माण झाला आहे. जम्मू-कश्मीरच्या जसरोटामध्ये ते एका निवडणूक सभेला काल संबोधित करत होते. त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं. त्यांच्या या वक्तव्यावर भाजपा नेते आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांनी पलटवार केला आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी विनाकारण आपल्या आरोग्याच्या विषयात पंतप्रधान नरेंद्र मोदींना ओढलं. “काल काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आपल्या भाषणात स्वत:चा पक्ष, नेते यांच्यापेक्षा पण अभद्र भाषा वापरली. आपल्या मनातील कटुता दाखवून दिली. व्यक्तीगत आरोग्याच्या विषयात पंतप्रधान मोदींना विनाकारणं ओढलं. पंतप्रधान मोदींना सत्तेवरुन हटवल्यानंतरच मरणार” असं खरगे म्हणाले.






“यातून काँग्रेसजनांच्या मनात पंतप्रधान मोदींबद्दल किती द्वेष आणि भिती भरली आहे, ते दिसतं. ते सतत मोदींबद्दल असा विचार करतायत. खरगे यांच्या प्रकृतीसाठी मोदी प्रार्थना करतायत. मी स्वत: प्रार्थना करतो. आम्ही सर्व प्रार्थना करतो, दीर्घकाळ खरगे यांची प्रकृती स्वस्थ रहावी. त्यांना दीर्घायुष्य मिळावं. 2047 सालचा विकसित भारत त्यांनी पहावा” असं अमित शाह यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
‘लवकर मरणार नाही’
मल्लिकार्जुन खरगे यांनी रविवारी काश्मीरमध्ये एका जनसभेला संबोधित केलं. जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी लढणार असं त्यांनी म्हटलं. त्यासाठी काहीही झालं तरी चालेलं. “मी जम्मू-काश्मीरला असच सोडणार नाही. मी 83 वर्षांचा आहे. लवकर मरणार नाही. मोदींना हटवत नाही, तो पर्यंत जिवंत राहणार. तुमच म्हणण ऐकणार, तुमच्यासाठी लढणार” असं खरगे म्हणाले.
‘त्यासाठी मोदी जबाबदार’
“मोदीजी जम्मू-काश्मीरमध्ये येऊन युवकांच्या भविष्यासाठी खोटे अश्रू ढाळत आहेत. मागच्या 10 वर्षात संपूर्ण देशातील युवकांना अंधारात ढकललं आहे. त्यासाठी मोदी जबाबदार आहेत” अशी टीका मल्लिकार्जुन खरगे यांनी केली.











