जालन्याच्या वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांचं गेल्या आठ दिवसांपासून उपोषण सुरु आहे. त्यांच्या उपोषणाचा आज नऊवा दिवस आहे. राज्य सरकारने त्यांच्या उपोषणाची दखल घेतली आहे. या दरम्यान, लक्ष्मण हाके यांनी मराठा नेते मनोज जरांगे यांच्यावर निशाणा साधलाय. “मिस्टर जरांगे तुम्हाला आरक्षणातलं पॉईंट शुन्यसु्द्धा ज्ञान नाही. देशाला स्वातंत्र्य मिळून 78 वर्ष झाली. मंडल आयोग लागू होऊन 27 ते 28 वर्षे झाली आहेत आणि 70 वर्षांचा जावयी शोध जरांगे काढला कुणी? म्हणून मी कायम सांगतो, जरांगे तुमची माझ्यासमोर बोलायची लायकी नाही. तुमच्या सल्लागारांना माझ्यासमोर बोलायला सांगा. कारण मंडल आयोग 1993-94 मध्ये लागू झाला, आणि 70 वर्षे आणले कुठून? अरे याला आधी शिक्षण द्या. याला अगोदर पॉलिसी शिकवा. माझी चिडचिड होते मला मान्य आहे. मी थोडसं एकेरी बोलतोय. पण आमच्या या वेदना आहेत, म्हणून हे शब्द येत आहेत. 70 वर्षे कुणाचे खायचा प्रश्नच येत नाही. 27 वर्षांत काय मिळालं?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला.
“मनोज जरांगे नेहमी आमचे ओबीसी नेते छगन भुजबळ यांना टार्गेट करुन म्हणतात की, भुजबळ तू सगळं खाल्लं आहे. या जरांगेंना माझ्या एक सवाल आहे. या महाराष्ट्रात आताचं कालचंसुद्धा बजेट, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर सुद्धा 60 टक्के ओबीसींना शंभर टक्क्यांपैकी एक टक्के सुद्धा बजेट ओबीसींसाठी राबवलं नाही. जरांगे कायदा बनवणारे कोण आणि त्याची अंमलबजावणी करणारे कोण? आमदार कोण, खासदार कोण आणि मुख्यमंत्री कोण? मराठेच ना? ओबीसीला एक टक्का बजेट कुणी देत नाही”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
“कुणी खायचा विषय येतच नाही. जरांगे ओबीसींनी आरक्षण खाल्लं असतं तर ओबीसींचे 400 कारखाने दिसले असते. या महाराष्ट्रात 200 साखर कारखाने आहेत. 100 सहकारी आणि 100 खासगी. त्यापैकी 10-15 कारखाने सोडले तर 90 टक्के कारखाने फक्त मराठा समाजाचे आहेत”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.
‘जरांगे तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा?’
“राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करायला जनता तयार आहे ना? तू कोण राजकीय कारकीर्द उद्ध्वस्त करणारा? या महाराष्ट्रातला ओबीसी, वीजीएनटी, एसबीसी हा जर एक झाला आणि त्या लोकांनी स्वाभिमानाला मत दिलं. तर जरांगे येणारा काळ ठरवेल, फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र काय आहे”, अशा शब्दांत लक्ष्मण हाके यांनी सुनावलं.
‘जरांगे जातीयवाद कोण करतंय?’
“जरांगे तुम्ही म्हणता मी जातियावाद केला नाही. छगन भुजबळ असतील, प्रकाश शेंडगे असतील, लक्ष्मण हाके असेल, महादेव जानकर, गोपीचंद पडळकर, मुंडे भाऊ-बहीण, विजय वडेट्टीवार असतील, ही माणसं या महाराष्ट्रातील जाती-उपजातीसह 492 जातींची भाषा बोलतात आणि जरांगे तुम्ही फक्त एका जातीची भाषा करतात. मग जरांगे नक्की जातीयवादी कोण?”, असा सवाल लक्ष्मण हाके यांनी केला. “या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला हवं आहे. आम्ही गेली सात-आठ महिने शांत बसलो. तुमची प्रत्येक गोष्ट पाहत राहिलो. जरांगे तुमची संविधानिक मार्गाने आंदोलने चालू होती ते आम्ही पाहत होतो. पण जरांगे तुम्ही बीड शहर जाळलं. टार्गेट करुन ओबीसी नेत्यांची कार्यालये, दुकानं, घरे जाळली. जरांगे जातीयवाद कोण करतंय?”, असं लक्ष्मण हाके म्हणाले.