यामुळे खडसे पुन्हा स्वगृही; शरद पवारांचा ऋणीही पण सर्व परिस्थिती पवारांना माहिती म्हणून मोठा निर्णय घेतला

0
3

काही वर्षापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आलेले एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये घरवापसी करत आहेत. गेल्या काही दिवसांपासून त्यांची चर्चा सुरू होती. अखेर त्यांनी दिलेल्या मुलाखतीत याबद्दल खुलासा केला. शरद पवारांची साथ सोडून भाजपमध्ये जाण्याचे कारणही एकनाथ खडसेंनी सांगितले. एकनाथ खडसे म्हणाले की, “एकतर अनेक वर्षांपासून भाजपच्या जुन्या आणि नवीन नेत्यांशी माझे केंद्रीय पातळीवर चांगले संबंध आहेत. बऱ्याचदा चर्चा होत असताना केंद्रीय पातळीवरील नेते तुम्ही भाजपमध्ये या… तुम्ही बरेच दिवस काम केले, वगैरे अशी चर्चा व्हायची.”

“त्या चर्चेच्या माध्यमातून काहीजण आग्रही व्हायचे की आता निवडणूक आलेली आहे, तुम्ही या. या कालखंडात तिकडे जाणे जरा अवघड वाटतं होतं. पण, आता मी माझा निर्णय घेतलेला आहे की, मला भाजपमध्ये परत जायचं आहे”, असे खडसे सुरुवातीला म्हणाले.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

कोणत्या कारणामुळे भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला?

या प्रश्नाला उत्तर देताना एकनाथ खडसे म्हणाले, “भाजप हे माझं जुनं घर आहे. या घराच्या बांधकामापासून ते आताच्या स्टेजपर्यंत माझं काम राहिलेलं आहे. कुठे न कुठे, कमी अधिक प्रमाणात माझं योगदान आहे. या घरामध्ये ४०-४२ वर्ष राहिलेलो आहे. अशा स्थितीत थोडी नाराजी झाली… काही नेत्यांसोबत होती. पण, ती नाराजी झाली म्हणून मी बाहेर पडलो.”

“बाहेर पडल्यानंतर आता त्या नाराजीची तीव्रता कमी झाली. म्हणून मी भाजप स्वगृही परत येतोय. माझं घर आहे, मी माझ्या घरात परत येतोय याचं समाधान मला वाटतंय”, असे उत्तर खडसेंनी दिले.

अधिक वाचा  पुणे महापालिका प्रभाग रचनेवर हरकतींचा पाऊस; शेवटचा दिवस; उत्तर आणि दक्षिण टोकावरील या प्रभागावर सर्वाधिक हरकती

आताच हा निर्णय का घेतला?

“माझा दिल्लीतील नेत्यांशी संपर्क तुटलेला नव्हता. गेल्या तीन-चार वर्षात आम्ही भाजपवर टीका केली किंवा मोदीजींवर टीका केली, असं एकही उदाहरण नाही. मी व्यक्तिगत कारणासाठी नाराजीमुळे भाजपमधून बाहेर पडलो. ती नाराजी माझी कमी झाली आणि मी परत आलो. मधल्या कालखंडात माझ्या भेटीगाठी गडकरींकडे कामानिमित्त व्हायच्या. रावसाहेब दानवे असतील, चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा व्हायची. कधी दरेकरांसोबत चर्चा व्हायची.”

“माझा संपर्क तुटला, असं काही नव्हतं. आता मला असं वाटलं की, या परिस्थितीमध्ये आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांनी मला मदत केली. याबद्दल मी त्यांचा ऋणी पण आहे. माझी सर्व परिस्थिती शरद पवारांना माहिती आहे. या प्रवेशासंदर्भात थोडी कल्पना मी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना दिली होती”, असे खडसे यांनी सांगितले.

अधिक वाचा  राज्यात 8 जिल्ह्यांना पुन्हा ‘ऑरेंज’अलर्ट गणेश विसर्जन पावसात?; कोकण, मध्य महाराष्ट्र अतिवृष्टीचा इशारा

“जयंत पाटलांनी आग्रह धरला की सोडू नये. पण, मी त्यांना माझी परिस्थिती समजून सांगितली. मला आता जाण्याची गरज का आहे. त्याप्रमाणे त्यांची सहमती जरी नाही मिळाली, तर त्यांच्या कानावर विषय घालून मी इकडे आलेलो आहे”, अशी भूमिका एकनाथ खडसेंनी मांडली.