शिवसेनेच्या ‘मावळ’ वर राष्ट्रवादीचा का आहे डोळा? मावळातील राजकीय गणिते बदलली का?

0

राज्यातील २०१९ ची लोकसभा निवडणूक शिवसेना-भाजप एकत्रितपणे लढले होते. विधानसभा निवडणुकीतही भाजप-शिवसेनेने चांगले यश मिळवले. मात्र मुख्यमंत्रीपदावरून या दोन पक्षात बेबनाव झाला. त्यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडून शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. त्यावेळी ५६ पैकी ४० आमदार आणि १८ पैकी १३ खासदार शिंदे गटात गेले आणि सरकार कोसळले.

आता आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपांबाबत महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी तयारीस सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसची लोकसभेबाबत नुकतीच आढावा बैठक पार पडली. यावेळी कायम शिवसेनेकडे राहिलेला गड मावळ लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे ठेवण्याची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. दरम्यान, २००९ पासून मावळातून कायम शिवसेनेचे उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आलेले आहेत. असे असतानाही आता राष्ट्रवादी काँग्रेसचा मावळ मतदारसंघावर डोळा का, अशा चर्चांना उधाण आले आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेची कास धरली. बारणे गेल्यानंतर ठाकरे गटाकडे आता लोकसभा लढविण्यासाठी उमेदवार नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या मतदारसंघातून पार्थ पवार, आमदार आदिती तटकरे व आमदार सुनील शेळके यांच्या नावांच्या चर्चा आहे.

मावळ लोकसभा मतदारसंघ रायगड आणि पुणे अशा दोन जिल्ह्यात विभागला आहे. येथून २०१९ मध्ये बारणे यांनी पार्थ पवारांचा अडीच लाख मतांनी पराभव केला होता. सत्तांतरानंतर मात्र मावळातील निवडणुकीची गणिते बदलल्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत. रायगडमध्ये शेकाप तर पुण्यात राष्ट्रवादीचे काँग्रेसचे वर्चस्व आहे. मावळ आणि पिंपरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. तर चिंचवडच्या पोटनिवडणुकीत पक्षाला चांगली मते मिळाली आहेत. याला शिवसेनेची साथ मिळाली तर राष्ट्रवादी काँग्रेसचा (NCP) उमेदवार निवडून येण्याचा दावा कार्यकर्ते करीत आहेत.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

NCP, Shivsena (UBT)

राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि काँग्रेसने महाविकास आघाडी (MVA) म्हणून निवडणूक लढविली तर ३४ जागा मिळण्याची शक्यता एका सर्व्हेक्षणातून स्पष्ट झाले आहे. त्यातच शिवसेनेत फूट पडल्यानंतर मावळात राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी झाली आहे. त्यामुळे आगामी २०२४ मध्ये सत्ताधारी शिवसेना-भाजपच्या उमेदवाराविरोधात मावळातून राष्ट्रवादी काँग्रेसला पर्याय नसल्याचा दावाही कार्यकर्ते करीत आहेत.