बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात अद्यापही नव्या घडामोडी समोर येत असून यातील प्रमुख आरोपी वाल्मिक कराडला कथितरित्या मदत करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर आमदार सुरेश धस यांनी आपला मोर्चा वळवला आहे. यामध्ये दीडशे ते दोनशे पोलीस अधिकाऱ्यांचा सहभाग असून या सर्वांची यादीच आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं देणार आहोत, असंही धस यांनी म्हटलं आहे.






तृप्ती देसाई यांनी सांगितलेला वाल्मिक कराडच्या मर्जीतल्या अधिकाऱ्यांचा २६ हा आकडा कमी असून तो १५०-२०० इतका असल्याचा ठाम दावा सुरेश धस यांनी केला आहे. ते म्हणाले, तृप्ती देसाईंनी फारच कमी आकडा सांगितला आहे. कारण हे सगळे कर्मचारी आणि पोलीस अधिकारी यांची बेरीज केली तर ती दोनशेवर जाईल. मी पण उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना याची यादी देणार आहे. बीड जिल्ह्याच्या बाहेरच मराठवाड्यातच नाहीतर लांब नेऊन टाका यांना असं मी त्यांना सांगणार आहे. कारण हे आजही त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत.
पोलीस दलातील आकाचे प्रेमी सध्या अरेरावीची भाषा बोलत आहेत. याच पोलिसांनी करुणा मुंडे यांच्या वाहनामध्ये बंदुका ठेवल्या होत्या. त्यामुळ पोलीस अधीक्षकांनी या लोकांना अजूनही सेवेत कसं काय ठेवलंय? हे मी किती वेळा सांगतोय, इतक्या शांत आणि थंड पद्धतीनं काम केल्यावर बीड जिल्हा कसा कन्ट्रोल होणार? असा सवालही त्यांनी यावेळी केला.
महादेव मुंडेंचा तपास स्थानिक गुन्हे शाखेंकडं द्यावा
पोलीस अधीक्षकांनी परळीतील दहा-वीस लोक गायब झाल्याचा तपास उप अधीक्षकांकडं दिला आहे. जर परळीतील लोक गायब झाले असतील तर मग महादेव मुंडेंचे आरोपी आजपर्यंत आकाच्या मुलाच्या अवतीभवती फिरत होते. आता ते अचानक गायब झाले आहेत, याचा तपास ज्यांच्याकडं सोपवलाय त्या डीवायएसपी यांनी अद्याप चार्जही घेतलेला नाही. त्यामुळं त्यांच्याकडं हा तपास देण्याऐवजी स्थानिक गुन्हे शाखेकडं हा तपास द्यावा. हे डीवायएसपी आकानंच आणलेले आहेत तर तुम्ही त्यांच्याकडं कसा तपास देता. महादेव मुंडेचे खुनी सापडले पाहिजेत, १५ महिने झालेत त्यांचा निर्घृणपणे खून केला आहे. तरीही त्याचा तपास होत नाही म्हणजे काय? त्यामुळं तृप्ती देसाई आणि अंजली दमानिया काय चुकीचं बोलत आहेत.











