कल्याणमध्ये पुन्हा एकदा परप्रांतीयांची दादागिरी पाहायला मिळाली आहे. गेल्या काही दिवसांत कल्याणमध्ये परप्रांतियांनी अक्षरश: धुडगूस घातलाय. चार वर्षाच्या मुलीशी अश्लील चाळे करणाऱ्याला जाब विचारण्यास गेलेल्या मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. उत्तम पांडे असं मारहाण करणाऱ्या इसमाचे नाव असून त्यांच्या पत्नीने देखील मारहाण केली आहे. दरम्यान, या प्रकारानंतर मानपाडा पोलीस ठाण्यात उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.






मराठी कुटुंबातील तरुणाची आई आणि पत्नी सुद्धा जखमी
याबाबत अधिकची माहिती अशी की, मराठी कुटुंबातील चार वर्षीय मुलीशी अश्लील चाळे करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. दरम्यान, याची माहिती संबंधित चिमुकलीच्या कुटुंबियांना समजल्यानंतर त्यांनी जाब विचारण्यास सुरुवात केली. मात्र, जाब विचारण्यास गेलेल्या कुटुंबास उत्तम पांडे आणि त्याच्या पत्नीकडून जबर मारहाण करण्यात आली आहे. मारहाणीत मराठी तरुण जखमी झालाय तर तरुणाच्या पत्नीला आईला देखील मारहाण करण्यात आली आहे. याशिवाय यामध्ये पोलीस कर्मचारी सुद्धा जखमी झाले आहेत. या प्रकरणी पांडे पती पत्नी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आलाय.
काही दिवसांपूर्वी अधिकाऱ्याकडून मराठी कुटुंबाला गुंड आणून मारहाण
काही दिवसांपूर्वी कल्याणमध्ये अशाच प्रकारे मराठी कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता असं म्हणत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकाराने महाराष्ट्रातून संताप व्यक्त करण्यात आला. दरम्यान, विरोधी पक्षांसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या प्रकरणावर आवाज उठवल्यानंतर संबंधित एमटीडीसीच्या अधिकाऱ्याचे निलंबन करण्यात आल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली होती.
एमटीडीसीमध्ये अधिकारी असलेला अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत एकमेकांचे शेजारी आहेत. दरम्यान, नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करत असाताना धूप लावत असतात. या धुपाचा धूर कळवीकट्टे यांच्या घरात जात असल्याने गीता यांच्या घरातील तीन वर्षाच्या बाळाला आणि वयोवृद्ध आईला दम लागतो. या धुराचा त्रास होतो असं सांगितलं. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली आणि मारहाण झाल्याचा प्रकार समोर आला होता.












