अखेर विधान परिषदेला मिळाला नवा सभापती, एकमताने निवड; मुख्यमंत्री फडणविसांनी मानले विरोधकांचेही आभार

0

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीनंतर सध्या राजकीय घडामोडी वेगाने घडताना दिसत आहेत. राज्यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्यानंतर आता त्यांचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. देवेंद्र फडणवीसांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तारही झाला. यात 33 कॅबिनेट मंत्री आणि 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर आता अनेक राजकीय गणित बदलण्यास सुरुवात झाली आहे. त्यातच आता भाजप नेते प्रा. राम शिंदे यांना एक मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. राम शिंदे यांची विधानपरिषद सभापती म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

राज्यात महायुतीला बहुमत मिळाले असेल तरी भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदाची माळ पुन्हा एकदा भाजपच्या गळ्यात पडली. त्यानंतर आता विधानपरिषदेच्या सभापतीपदी कोणाची निवड केली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेना नेत्या आमदार निलम गोऱ्हे या विधानपरिषदेच्या सभापती पदासाठी इच्छुक होत्या. विधानपरिषदेचे सभापतीपद आपल्याला मिळावे, यासाठी शिवसेनेने जोरदार प्रयत्न केले होते. मात्र विधान परिषदेतील संख्याबळामुळे भाजपने स्वत:कडे सभापतीपद ठेवत शिवसेनेला धक्का दिला आहे. विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी भाजपमधून राम शिंदे आणि प्रवीण दरेकर यांच्या नावाची चर्चा रंगली होती. मात्र भाजपकडून राम शिंदे यांना संधी देण्यात आली.

अधिक वाचा  हवामान विभागाकडून नकोसा इशारा जारी…अवकाळीचा वादळी मारा सोसण्यासाठी तयार राहा!

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रामराजे निंबाळकर यांचा कार्यकाळ संपल्यानंतर ७ जुलै २०२२ पासून विधानपरिषदेचे सभापतीपद रिक्त आहे. या पदासाठी आज निवड प्रक्रिया पार पडली. राम शिंदे यांनी काल विधानपरिषदेच्या सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. या पदासाठी अर्ज करण्यासाठी १८ डिसेंबर रोजी दुपारी १२ वाजेपर्यंत मुदत देण्यात आली होती. तर सभापतीपदासाठी १९ डिसेंबर रोजी निवडणूक होईल असे सांगण्यात आले होते. त्यानुसार, विधानपरिषदेचे सभापतीपदासाठी फक्त राम शिंदे यांचा अर्ज दाखल झाला होता. यामुळे भाजप नेते राम शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

राम शिंदेंनी पदभार स्वीकारला
राम शिंदे यांची विधानपरिषदेच्या सभापती म्हणून निवड झाल्यानंतर त्यांनी कारभार स्वीकारला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी यावेळी राम शिंदेंना शुभेच्छा दिल्या. यानंतर देवेंद्र फडणवीसांनी भाषण केले.

अधिक वाचा  दिवाळीचा पुणे मेट्रोला ‘झटका’! आर्थिक गणित बिघडले प्रवासी संख्या २.३६ लाखांवरून थेट १२ हजारांवर

विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार – देवेंद्र फडणवीस
“मी राम शिंदे यांचे अतिशय मनापासून अभिनंदन करतो. या सभागृहाने एकमताने राम शिंदे यांची सभागृहाच्या सभापतीपदी निवड केली, त्याबद्दल मी सभागृहाचेही आभार मानतो. सभापतीपदाची निवड ही निवडणूक पद्धतीने होत असली तरी एकमताने सभापतीची निवड करावी, या परंपरेला साजेसा निर्णय विरोधी पक्षाने घेतला. त्याबद्दल मी विरोध पक्षाचे अतिशय मनापासून आभार मानतो. प्राध्यापक राम शिंदे हे जे सर आहेत. त्यामुळे क्लास कसा चालवायचा याची त्यांना निश्चित सवय आहे. त्यामुळे मला विश्वास आहे की तुम्ही अतिशय शिस्तीने आणि संवेदनशीलतेने या सभागृहाचा कारभार चालवाल, याबद्दल माझ्या मनात कोणतीही शंका नाही”, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन