शिवसेनेच्या इशाऱ्यानंतर अमोल कोल्हेंचा पिंपरीतील जनता दरबार रद्द; महाविकास आघाडीत बिघाडी?

0

लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार असलेल्या अमोल कोल्हे यांना दुसऱ्यांदा शिरुर लोकसभा मतदारसंघातून प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली. येथील जनतेने शिवाजीराव आढळराव पाटील यांना नाकारत कोल्हेंना दुसऱ्यांदा खासदार केले. त्यामुळे, साहजिकच त्यांचा उत्साह वाढला असून आता विधानसभा निवडणुकांसाठी ते कार्यकर्त्यांना बळ देत आहेत. त्याच अनुषंगाने भोसरी विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी 18 जुलै रोजी आयोजित केलेले जनता दरबार कार्यक्रम काही अपरिहार्य कारणास्तव रद्द करण्यात आला आहे. मात्र, शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी नाराजी दर्शवल्यामुळे आणि राष्ट्रवादीला इशारा दिल्यामुळेच हा दौरा रद्द करण्यात आल्याचे समजते.

अधिक वाचा  बालेकिल्ला ‘अबाधित’साठी सर्व प्रभागात २/१ चेहरे बदल? स्थानिकांची नवी रणनीती विद्यमान गॅसवर

लोकसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर खासदार डॉ. कोल्हे यांनी शिरूर लोकसभा मतदारसंघात विधानसभानिहाय जनता दरबार कार्यक्रमाचे आयोजन केले. त्यानुसार हडपसर, आंबेगाव विधानसभा मतदारसंघातही जनता दरबार कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर, भोसरी विधानसभा मतदारसंघात 18 जुलै रोजी दोन ठिकाणी जनता दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, काही अपरिहार्य कारणास्तव हे दोन्ही जनता दरबार तूर्तास पुढे ढकलण्यात आले असून लवकरच नवीन तारीख कळविण्यात येणार आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील महायुती तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरू करून दिली आहे. पिंपरी चिंचवडमधील तीनही विधानसभा मतदारसंघात महायुतीला शह देण्यासाठी महाविकास आघाडीकडून राजकीय चाचपणी सुरू आहे. त्यातच, शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाने आणि स्थानिक इच्छुकांनी कामाला सुरुवात केल्याचं दिसून येत आहे. विशेष म्हणजे आजच अजित गव्हाणे यांच्या शरद पवार गटातील प्रवेशाने महाविकास आघडीत काहीही बिघाडी झाल्याचं चित्र आहे. तर, दुसरीकडे भोसरी विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीच्या दावेदार सुलभा उबाळे यांनी भोसरीमध्ये यंदा मशाल पेटवू, रुतलेल्या विकासाला नवदिशा देऊ.. असा संकल्प केला. त्याच अनुषंगाने खासदार अमोल कोल्हे यांनी येथे जनता दरबाराचे आयोजन केले होते. मात्र, ऐनवेळी हा जनता दरबार रद्द करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चा होत आहेत.

अधिक वाचा  EVM मध्ये नावाचा क्रम बदलला, पक्षांची मक्तेदारी की सुलभता? पक्ष आणि उमेदवारांची अशी दिसणार नावं!

अजित गव्हाणेंच्या प्रवेशानंतर दौरा रद्द

पिंपरी-चिंचवडमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे आणि समर्थकांनी आज शरद पवारांच्या राष्ट्रवादीत पक्षप्रवेश केला. त्यानंतर आता त्याचे पडसाद ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये उमटल्याचं चित्र दिसून येत आहे. अजित गव्हाणे आणि समर्थकांच्या पक्षप्रवेशानंतर भोसरी विधानसभेतील शिवसैनिकांनी आणि पदाधिकाऱ्यांनी तातडीनं बैठक घेतली. त्यामध्ये अजित गव्हाणेंना तिकीट दिलं, तर आपण तुतारीचा प्रचार करायचा का नाही? याबाबत प्रदीर्घ चर्चा झाली असल्याची माहिती समोर आली. त्यातूनच अमोल कोल्हेंचा पिंपरी दौरा रद्द झाल्याची माहिती आहे.