महाविकास आघाडीला विविध सर्व्हेमध्ये अधिक जागा मिळण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे, त्यामुळेच महाविकास आघाडीचे नेते पळविण्याचे काम भाजपकडून (सत्ताधारी) सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक त्यामुळेच लांबणीवर टाकली जात आहे. सर्व्हे रिपोर्टमुळे सत्ताधारी घाबरले आहेत, असा हल्लाबोल आमदार प्रणिती शिंदे यांनी भाजपवर केला.
मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांतील प्रमुख कार्यकर्त्यांची पाणी प्रश्नावर प्रणिती शिंदे यांनी बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीत बोलताना प्रणिती शिंदे यांनी महाविकास आघाडीचे नेते पळविण्याच्या भाजपच्या नीतीवर शरसंधान केले. त्या म्हणाल्या, लहानपणापासून मी सत्ता उपभोगली आहे. टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी मला राजकारण करायचे नाही. जनतेचे प्रश्न सोडविण्याला माझे अधिक प्राधान्य आहे. काँग्रेसचा विचार कोणीही मारू शकत नाही.
सरकारने स्मार्ट सिटी योजना राबविण्यापेक्षा स्मार्ट गावे हा उपक्रम राबविण्याची गरज आहे. सरकार इतर कामांवर कोट्यवधींचा निधी खर्च करत आहे. मात्र, पाणी देण्यासाठी लागणारा निधी ही किरकोळ बाब आहे. पण, त्याकडेही दुर्लक्ष केले जात आहे. मंगळवेढ्याच्या पाण्याचा प्रश्न मी यापूर्वी अनेकदा उपस्थित केला आहे. पण, मंगळवेढ्याच्या पाण्याचा विषय मला अर्धवट घ्यायचा नव्हता. त्यामुळेच मी त्यात लक्ष घातले नव्हते. अर्धवट माहितीवर प्रश्न मांडला असता, तर अर्धवट पाणी मिळाले असते. भागातील पाण्यासाठी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मी आवाज उठविणार आहे, असेही प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केले.
धर्म, जात हे विषय महत्त्वाचे आहेत. पण, धर्म धर्म करून एक दिवस जनता उपाशी मरेल, त्यामुळे काम करणाऱ्यांना जनतेनेही विसरू नये. दोन वेळा सत्ता देऊनही मंगळवेढ्याच्या विकासासाठी केलेल्या पाच गोष्टी सांगाव्यात. दोन वेळा संधी मिळूनही मंगळवेढा तालुक्यासाठी काहीच केलं नसेल तर त्यांना संधी का द्यायची, असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला.
पाणी परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव काळुंगे म्हणाले, गेली काही वर्षांपूर्वी या योजनेला मंजुरी दिली आहे. प्रत्यक्षात पाणी येण्यास विलंब होत आहे. म्हैसाळ योजनेचे पाणी कमी दाबाने मिळत आहे. आमच्या आजोबापासून या भागाला पाणी येणार असे ऐकत आहाेत. मात्र, प्रत्यक्षात पाण्याचा विषय अद्याप मार्गी लागला नाही. दुष्काळनिधी, गारपीट, पीकविमा या गोष्टीतही मंगळवेढ्यावर सातत्याने अन्याय होत आहे. या प्रश्नात लक्ष घालावे, अशी विनंती तालुकाध्यक्ष प्रशांत साळे यांनी दिली.
या वेळी सुनजय पवार, ॲड नंदकुमार पवार, फिरोज मुलाणी, माधवानंद आकळे, बिरुदेव घोगरे, लक्ष्मण गायकवाड, दिलीप जाधव, मारुती वाकडे, फिरोज मुलाणी, दादा पवार, अर्जुनराव पाटील, अमर सूर्यवंशी, नाथा ऐवळे, मनोज माळी, रविकिरण कोळेकर उपस्थित होते.