राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवारांच्या PAच्या मुलीचा मृत्यू; पोलीस तपासात धक्कादायक कारण समोर

0

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांचे स्वीय सहाय्यक (PA) अजित दशावतारे यांच्या 14 वर्षीय मुलीच्या मृत्यूची धक्कादायक घटना बारामतीत समोर आली आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, आई रागावल्याच्या कारणातून मुलगी घरातून निघून गेली होती. त्यानंतर तिचा मृतदेह एका पाच मजली इमारतीत आढळून आला. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी पत्रकार परिषदेत या प्रकरणाची माहिती दिली.

आई रागावल्याने घर सोडलं

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बारामती शहरातील रुई परिसरातील साई गणेश नगर येथे राहणारी ही मुलगी 22 ऑगस्ट रोजी आई रागावल्यामुळे घरातून निघून गेली होती. ती रात्रभर घरी परतली नाही. बराच शोध घेऊनही तिचा ठावठिकाणा न लागल्याने पालकांनी 25 ऑगस्ट रोजी पोलिसांकडे अपहरणाची तक्रार दाखल केली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला. शोध घेत असताना शहरातील एका पाच मजली इमारतीमध्ये मुलीचा मृतदेह आढळून आला.

अधिक वाचा  विधान परिषदेच्या 5 जागांसाठी आज मतमोजणी शिक्षक- पदवीधरांचा आमदार कोण? कुणाचा गुलाल उधळणार?

गच्चीचा दरवाजा बाहेरून बंद

घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर पोलिसांना काही महत्त्वाचे पुरावे मिळाले. गच्चीचा दरवाजा मुलीने बाहेरून बंद केला होता, तसेच तिची चप्पलही घटनास्थळी आढळून आली. उपलब्ध तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे मुलीने पाचव्या मजल्यावरून उडी घेतल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिली. या घटनेमुळे बारामती शहरासह राजकीय वर्तुळातही हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांकडून या प्रकरणातील पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.