पुणेकरांनो सावध! खडकवासल्यातून पाणी विसर्ग वाढला, प्रशासनाचा अलर्ट! रात्रीपासून पावसाचा जोर कायम!

0

पुणे शहर व जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू असल्याने प्रमुख धरणे भरली आहेत. खडकवासला धरणातून मुठा नदीत सुमारे ९००० क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.मुठा नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगडसह अनेक भागांत मुसळधार पाऊस आहे.

सकाळपासून पुण्यातील मध्यवर्ती भाग, उपनगरांसह परिसरात सतत रिपरिप सुरू आहे. घाटमाथ्यावर आणि डोंगराळ भागात पावसाची दमदार हजेरी बघायला मिळत आहे. यामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. १२ टीएमसी क्षमतेचे हे धरण १०० टक्के भरल्याने पुणे, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाणी उपलब्धतेबरोबरच शेतीसाठी उपयुक्तता वाढली आहे.

अधिक वाचा  २-२-१ वारं फिरलं..! शिक्षक-पदवीधर निवडणुकीत राष्ट्रीय पक्षांना ‘कही खुशी कभी गम’चा धक्का; धक्कादायक अंदाज

धरण पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पाऊस

खडकवासला धरण पाणलोट क्षेत्रात देखील दमदार पाऊस सुरू असल्याने धरण १०० टक्के भरले आहे. यामुळे सकाळी ९ वाजता ५७८३ क्युसेक्सवरून विसर्ग वाढवून ७९२५ क्युसेक्सने मुठा नदीत पाणी सोडण्यात येत आहे. प्रशासनाने नदीकाठच्या नागरिकांना सतर्क राहण्याचे, कमी दर्जाच्या घरांमध्ये राहणाऱ्यांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. पूरस्थिती निर्माण होऊ नये यासाठी नियंत्रण कक्ष सक्रिय करण्यात आला आहे.

निरा देवघर धरण भरले

पुणे जिल्ह्यातील डोंगरमाथ्यावर सतत पडणाऱ्या पावसामुळे भोर तालुक्यातील निरा देवघर धरण भरल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. या धरणामुळे खालच्या भागातील शेती आणि पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास मदत होणार आहे. सोलापूरसह साताऱ्यातील शेतकऱ्यांना पाण्याची चिंता कमी झाली आहे.

अधिक वाचा  सांगली जिल्हा बँकेत दिग्गजांचे अर्ज मागे, 21 पैकी 15 जागा बिनविरोध : पडळकर, घोरपडेंच्या गटात मात्र निवडणूकच होणार

हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष

दरम्यान, पुणे महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पाटबंधारे विभाग सतर्क मोडमध्ये आहे. रस्त्यांवर पाणी साचण्याची शक्यता असल्याने वाहतूक पोलिसांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. नदीकाठ, नाल्याकाठ आणि कमी उंचीच्या भागात राहणाऱ्या नागरिकांनी हवामान खात्याच्या इशाऱ्याकडे लक्ष ठेवावे, असे सांगण्यात आले आहे.

अतिवृष्टीची शक्यता

हवामान विभागाने पुढील काही दिवस पुणे व परिसरात पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता वर्तवली आहे. घाट विभागात अतिवृष्टीची शक्यता असल्याने प्रवाशांनी सावधगिरी बाळगावी. शेतकऱ्यांसाठी ही पावसाची सरसकट चांगली बातमी असली तरी शहरातील पूर आणि वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ शकते.

अधिक वाचा  बंगालच्या उपसागरात चक्रीवादळाचा भडका; महाराष्ट्रात ऐन दिवाळीत पाऊस? हवामान विभागाचा मोठा इशारा!