महाराष्ट्राला पाऊस झोडपणार, संपूर्ण आठवडा विजांचा कडकडाट होणार; मुंबई-पुण्यासह कुठे-कुठे कोसळणार?

0

राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून या आठवड्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आहे. २० जुलै रोजी दक्षिण मध्य महाराष्ट्र, कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस बरसणार आहे.याशिवाय मुंबई महानगर प्रदेशात देखील रविवारी रात्रभर धो-धो पाऊस कोसळत आहे. हवामान विभागाने सकाळी ७ वाजता जाहीर केलेल्या अंदाजानुसार मुंबई, ठाणे आणि रायगड या तीन जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाल्यानंतर पावसाने काही काळासाठी विश्रांती घेतली होती. परंतु, गेल्या काही दिवसांपासून राज्यात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. राजस्थानच्या श्री गंगानगरपासून रोहतक, हरदोई, वाराणसी, रांची, सागार बेटे ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत १.५ किलोमीटर उंच कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. शिवाय मध्य प्रदेशात समुद्राच्या सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर, उत्तर आंध्र प्रदेशची किनारपट्टी आणि दक्षिण छत्तीसगडमध्ये ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे सक्रिय झाले आहेत. या सर्व प्रणालींमुळे महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांने पुन्हा वेग पकडला आहे.

अधिक वाचा  शासन आदेश ३०४ दुष्काळी तालुक्यांमध्ये जलसंधारणालाच प्राधान्य; प्रत्येक गावात १०० जलशोषक खड्डे, नाले खोलीकरण

मुंबई-पुण्यातील हवामान

मुंबई, ठाणे जिल्ह्यांमध्ये सोमवारी मुसळधार पावसाची शक्यता आहेत. हवामान विभागाने सकाळी सात वाजता सतर्कतेचा इशारा दिला आहे. त्यासह पुणे जिल्ह्यातही घाटमाथ्यावर आज जोरदार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

कोकणातील हवामान कसं असेल?

पावसाचा जोर ओसरला होत तेव्हाही कोकण किनारपट्टीवर तुरळक ठिकाणी पाऊस सुरू होता. २० जुलै रोजी रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात हलक्या सरींची शक्यता आहे. दरम्यान रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि खान्देशातील हवामान कसं असेल?

उत्तर महाराष्ट्रात धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये सोमवारी हलक्या पावसाची शक्यता आहे. नाशिक जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील पण घाटमाथ्यावर मध्य वादळी वाऱ्यांसह मध्यम पावसाची नोंद होण्याची शक्यता आहे. जळगाव जिल्ह्यातही पावसाचा जोर कमीच राहील.

अधिक वाचा  नागपूर पदवीधर ६४.७६ टक्के मतदान वर्धा, गडचिरोलीत सर्वाधिक प्रतिसाद; नागपूरमध्ये निरुत्साहच टक्केवारीही घटली

पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस

पश्चिम महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज आहे. मेघगर्जनेसह कोसळणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाचा अंदाज आहे. साताऱ्यात घाटमाथा परिसरात मुसळधार पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.

मराठवाड्यातील हवामान

मराठवाड्यातही या आठवड्यात मोसमी वाऱ्यांचा वेग वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना आणि परभणी जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही हलका पाऊस होण्याची शक्यता आहे.

विदर्भातील हवामान कसं राहील ?

संपूर्ण महाराष्ट्रात मान्सून सक्रिय झाला असला तरी विदर्भातील वातावरण अजून कोरडचं आहे. रविवारी काही ठिकाणी हलका पाऊस झाला असला तरी सोमवारी पावसाची शक्यता फार कमी आहे. अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांत वातावरण शांत असेल. हवामान विभागाकडून कोणताही अलर्ट देण्यात आलेला नाही.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव