तुकाराम मुंढेंच्या टीमची पुण्यात 70 रेस्टॉरंटवर कारवाई; ग्रँड पुरंदर, नॅशनल 360सह 7 हॉटेलचा खेळ खल्लास

0

राज्यभरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात धडक मोहीम राबवणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने (FDA) आता पुण्यातील नामांकित हॉटेल्स, रेस्टॉरंट्स मोठी कारवाई केली आहे.आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या सात हॉटेल-रेस्टॉरंटचे अन्न सुरक्षा परवाने निलंबित करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, या कारवाईत एका प्रसिद्ध रेस्टॉरंटचाही समावेश असल्याने या कारवाईची मोठी चर्चा सुरू झाली आहे.

अन्न व औषध प्रशासनाने सेफ फूड, सेफ महाराष्ट्र या मोहिमेअंतर्गत पुणे विभागात 1 ते 3 जुलैदरम्यान 70 हॉटेल व रेस्टॉरंटची तपासणी केली. तपासणीत अस्वच्छता, अन्न सुरक्षा व मानके कायद्याचे उल्लंघन तसेच काही ठिकाणी मुदतबाह्य अन्नसाठा आढळून आल्याने 7 आस्थापनांचे परवाने तात्काळ निलंबित करण्यात आले.

अधिक वाचा  ‘भाजपचा सत्ता-संपत्तीचा माज आत्ता बास सुशिक्षित स्वाभिमानी मतदार उतरवणार’; हर्षदा देशमुख-जाधव

कोणती आहेत ती 7 हॉटेल?

निलंबित आस्थापनांमध्ये हॉटेल ग्रँड पुरंदर सिंहगड रोड, क्राऊन बेकर्स सिंहगड रोड, मे. ॲग्रोटीस केटरिंग प्रा. लि. ता. आंबेगाव, जि. पुणे, बरकत बिर्याणी हाऊस वाघोली पुणे, रॉयल बिर्याणी हाऊस वाघोली पुणे आणि नॅशनल 360 बावधन, पुणे यांचा समावेश आहे. तुकाराम मुंढेंच्या कारवाईमुळे भेसळखोरांचे धाबे दणाणले आहेत. अनेक हॉटेल्सने कारवाईच्या धास्तीने पनीर फेकल्याचे वृत्त समोर आले होते.

तपासणी मोहीम सुरू

अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार ही तपासणी मोहीम सुरू असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसेच हॉटेल व्यावसायिकांनी स्वच्छता, अन्न सुरक्षा नियम आणि मोफत शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्नाच्या दर्जाबाबत तक्रारींसाठी नागरिकांनी 18002223635 या टोल-फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असेही प्रशासनाने म्हटले आहे.

अधिक वाचा  पुणे शिक्षक मतदारसंघ १८ वर्षांचा दुष्काळ कौस्तुभ गावडेंनी संपवला; चंद्रकांतदादांच्या दुहेरी विजयानंतर ‘पदवीधर’मध्ये सलग दुसऱ्यांदा पराभव

पदभार स्वीकारल्यानंतर कारवाईचा धडाका

राज्य सरकारने 25 मे 2026 रोजी तुकाराम मुंढे यांची आयुक्तपदी नियुक्ती केली होती. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी राज्यभरात गुटखा, पानमसाला, निकृष्ट अन्नपदार्थ आणि अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात आक्रमक मोहीम सुरू केली आहे. अनेक नामांकित हॉटेल्स आणि रेस्टॉरंट्सवर झालेली ही कारवाई त्याच मोहिमेचा भाग मानली जात असून, पुढील काळातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत अन्न व औषध प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.